माथेरान (मुकुंद रांजाणे) : सत्तेच्या सारीपाटासाठी इथली राजकीय पक्षांची मंडळी वेळप्रसंगी कुणाच्याही आधारावर नगरपरिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी आग्रही दिसत आहेत. मागील २०१६ च्या निवडणुकी मध्ये शिवसेनेची स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन झाली होती. सतरा पैकी चौदा जागांवर त्यांनी निर्विवाद बहुमत प्राप्त केले होते. एका जागेवर काँग्रेस पक्षाला समाधान मानावे लागले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात दोन जागा मिळाल्या होत्या. त्या पाच वर्षात केवळ काँग्रेस पक्षाने सत्ताधारी शिवसेनेला पाठबळ दिले नव्हते.
काँग्रेसचा एकच नगरसेवक पाच वर्षे विरोधात राहिला होता.परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोनही सदस्य शिवसेनेच्या गोटात अप्रत्यक्षपणे सहभागी झाले होते. सत्ताधारी शिवसेनेने आपल्या परीने मागील जुन्या निधीच्या जोरावर काही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले.होणाऱ्या काही ठराविक निकृष्ट कामांना ठाम विरोधात जाण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत तात्पुरता विरोध झाला होता परंतु सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही त्यामुळे जवळपास निम्म्याहून अधिक कामांची बिले ठेकेदारांना अदा करण्यात आली होती.
२०१६ च्या निवडणुकीत ज्यांनी एकमेकांच्या विरोधात रणशिंग फुंकले होते. त्या मंडळींना सुरुवातीपासून आर्थिक बाबीची पूर्तता करण्यात आल्याने सत्ताधारी सेनेला काँग्रेस वगळता कुणीच विरोधक राहिला नव्हता. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे राजकारणी कधी एकत्र झाले हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सुध्दा माहीत नव्हते. काही राजकीय नेत्यांनी मागील काळात इथल्या बंगल्याचे आपल्या पोटासाठी खरेदीविक्री व्यवहार सुरू केले होते.त्यात ही विरोधक मंडळीनी गळ्यातगळा घालून वैयक्तिक कामे पूर्ण केली आहेत. नेत्यांनी फक्त एकमेकांचे हीत जोपासण्यात धन्यता मानली होती. पाच वर्षे कार्यकर्त्यांना एकप्रकारे दुय्यम स्थान देण्यात आले होते.
यापुढेही येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकी मध्ये होणाऱ्या युत्या आघाड्या ह्या केवळ दिखाव्यापुरता असणार आहेत. ठराविक मंडळीनी सभागृहात जाऊन नेहमीप्रमाणे आपले, कुटुंबाचे आणि जवळच्या नातेवाईकांचे हीत करून कार्यकर्त्यांचा सर्वच पक्ष वापर करून घेणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुणासोबत राहावे हा प्रश्न उपस्थित होणार आहे.
ज्यांचा गावच्या सर्वांगीण विकासासाठी विरोध आहे अशा राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी जागा दाखवून देण्याची वेळ लवकरच येणार आहे. ज्यांचा या गावाशी काडीचाही संबंध नाही, इथे फक्त व्यवसाय करून, पर्यटकांची दिशाभूल करून माथेरानची प्रतिमा मलिन करण्याचा कुटील प्रयत्न करत आहेत अशाच मतदारांना केवळ सत्तेसाठी राजकारणी पक्षांकडून गोंजारले जात आहे.
सहसा कुणीही राजकारणी विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात केवळ मतांसाठी भ्र शब्द काढत नाहीत.आगामी काळात विकास कामांसाठी येणाऱ्या भरीव निधीवर डोळा ठेऊन सत्तेसाठी कुणाच्याही सोबत युती आघाडी करण्याची तयारी सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.अनेक प्रकल्प माथेरान साठी प्रलंबित आहेत परंतु सत्तेशिवाय कामेच करायची नाही अशी स्वतःला अभ्यासू ,हुशार समजणाऱ्या नेत्यांची मानसिकता झाल्याने आगामी निवडणुकीत सत्तेत विराजमान होऊन प्रलंबित कामे पूर्ण करणार अशीही राजकीय मंडळी प्रामुख्याने इथेच पहावयास मिळते.
—————————
मतदारांनी निवडुन दिलेले बहुतेक लोकप्रतिनिधी मागील दोन वर्षांपूर्वी आर्थिक लाभासाठी अन्य पक्षात गेले होते त्यातील काहींना पुन्हा दामदुप्पट रक्कम देऊन स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. काही कुटुंबातील सदस्यांनी पक्ष वाटून घेतले आहेत. त्यामुळे कुणाचीही सत्ता स्थापन झाली तरी आर्थिक लाभ त्या त्या महत्वकांक्षा बाळगणाऱ्या मंडळींनानेहमीप्रमाणे आपसूकच होणार आहे. निष्ठावंत कार्यकर्ता नेहमीप्रमाणे ओल्या सुक्या पार्ट्यांमध्ये सामील होऊन आपल्या नेत्यांसाठी छाती बडवणार आहे.
माथेरान हे छोटेसे गाव असल्याने साहजिकच निवडणुका झाल्यावर सर्वजण सुखदुःखात एकत्रित येतात.सत्ता कुणाचीही येवो निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देऊन जे विरोधात होते त्यांची कामे मोठया लगबगीने पूर्ण केली जातात हे आजवर सर्वच कार्यकर्त्यांना ज्ञात आहे त्यामुळे आगामी काळात कुणाचा झेंडा हाती घ्यायचा हे कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे.