माथेरान (मुकुंद रांजाणे) : दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षात पक्षप्रवेश केल्यास मतपरिवर्तन आणि आपल्या पक्षातून दुसरीकडे गेल्यास गद्दार ही पक्षप्रवेशाची बाब सध्या माथेरानमध्ये जोरात सुरू असून जेमतेम चार हजारांच्या आसपास संपूर्ण गावातील मतदार संख्या असताना अन्य पक्षाचे कार्यकर्ते आपल्या गोटात समाविष्ट करण्यासाठी इथे स्पर्धाच सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करून घेण्यात सध्यातरी शिवसेनेचा शिंदे गट आघाडीवर दिसत आहे. काही प्रभागातील कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने शिंदे गटात उडी घेतली आहे.
महाविकास आघाडी मधील बहुतांश कार्यकर्त्यांना शिंदे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या गोटात आधार दिला आहे.आपल्या राजकीय जादूने चंद्रकांत चौधरी हे काही प्रभागातील कार्यकर्त्यांना पक्षात खेचून आणण्यात यश मिळवत आहेत तर अन्य पक्षाच्या नेत्यांनी या होणाऱ्या प्रक्रियेबाबतीत सध्यातरी मौन बाळगले आहे.त्यांना ठाऊक आहे की अद्यापही नगरपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत त्यामुळे उगाचच आपल्या पक्षात प्रवेश करून काही काळ कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी आर्थिक खर्च उचलावा लागणार आहे. सर्वच कार्यकर्ते हे अभ्यासू नसतात काहींना फक्त ओल्या आणि सुक्या पार्ट्या मिळाल्या की ते समाधानी होतात त्यामुळेच अन्य पक्षाचे नेते बघ्याची भूमिका बजावत आहेत.
ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मागील काळात ज्यांना ज्यांना सत्तेत स्थान दिले होते तेच सक्रिय कार्यकर्ते दुसरीकडे धूम ठोकताना दिसत आहेत. दर पाच वर्षांनी इथे हेच चित्र पहावयास मिळते यात नवल नाही परंतु या संपूर्ण पक्षप्रवेशाच्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांना एखाद्या फुटबॉल प्रमाणे नेतेमंडळी उडवत असतात. सत्तेत सहभागी होईपर्यंत सगळेच नेते कार्यकर्त्यांना खूपच गोंजारून आपली पोळी भाजून घेतात आणि एकदा का सत्ता मिळाली की ज्यांनी निवडणुकीत आपल्या विरोधात प्रचार केला आहे त्यांना अधिक प्रमाणात जवळ घेतले जाते त्यांची सगळी कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
कार्यकर्ते हे सर्वसामान्य असतात त्यांना इतर काही बाबींची पुसटशी कल्पना नसते की ज्यांच्या सोबत आपण आहोत ज्यांच्यावर अती विश्वास ठेवून त्यांच्या सोबत कामे करणार आहोत ते खरोखरच एकदिलाने आपल्याशी एकनिष्ठ आहेत की नाही याबाबत हे कार्यकर्ते अनभिज्ञ असतात त्यामुळेच सर्वच पक्षाचे नेते याचा गैरफायदा घेऊन कार्यकर्त्यांचा प्रत्येक वेळेस वापर करून घेतात. हीच राजकीय मंडळी एकोप्याने आपले व्यवसाय असोत,आर्थिक देवाणघेवाण किंवा सभागृहात जाण्यासाठी राजकीय मदत घेत असतात. आणि जरी सत्तेत असले किंवा नसले तरी सुध्दा आपली कामे पूर्ण करून घेतात. यामध्ये केवळ कार्यकर्ता भरडला जातो आहे त्याला दर पाच वर्षांनी फुटबॉल प्रमाणे उडविले जाते आणि तो सुध्दा निमूटपणे हे सहन करत आहे.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत कोण कुणाशी युत्या आघाड्या करतील याचाही नेम नाही. ज्या कार्यकर्त्यांनी आपला पक्ष सोडून अन्यत्र विलीन झाले आहेत त्यांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीत युती, आघाडी केल्याशिवाय आजवर कुणालाही एकहातीसत्ता स्थापन करता आलेली नाही त्यामुळे जे कार्यकर्ते आपला पक्षाचा त्याग करून गेले आहेत त्यांना नाईलाजाने पुन्हा आपल्या जुन्या सोबत्यांसोबत खाली मान घालून प्रचाराला सामोरे जावे लागणार आहे.अशाच द्विधा मनस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना पुढील वाटचाली कराव्या लागतील यात शंकाच नाही.