माथेरान (मुकुंद रांजणे) : निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि चोहोबाजूंनी घनदाट जंगलाने व्यापलेल्या माथेरान मध्ये मागील काही वर्षांपूर्वी इथे नवीन हॉटेल्सची निर्मिती झाली त्यावेळी मोठया प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली होती. त्यामुळे इथल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इथे नव्याने कार्यभार स्वीकारून वनपाल आर. आडे यांनी स्वतः जातीने लक्ष केंद्रित करून आपल्या सहका-यांसोबत संपूर्ण माथेरानचा परिसर अक्षरशः पिंजून काढत आहेत.त्यामुळे सध्यातरी त्यांच्या कार्यकाळात वृक्षतोड प्रकरणास आळा बसला आहे. येथील जुन्या बंगल्याचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर होत असल्याने त्या सेट व्हीला या बंगल्यात सुध्दा स्वतः जाऊन त्यांनी पाहणी केली आहे. त्याठिकाणी खरोखरच वृक्षतोड झाली आहे किंवा कसे याबाबत आढावा घेतला आहे. आणि त्याठिकाणी सध्यातरी ५२६ झाडे हयात दिसत आहेत असे त्यांनी सांगितले. एकंदरीत माथेरानचे पर्यावरण अबाधित राहावे इथली वनराई अधिकाधिक जोमाने वाढावी यासाठी जंगल भागातील रस्त्यालगत तारेचे कुंपण केल्यास जंगलात कुणी वृक्षतोड करण्यासाठी शिरकाव करणार नाही आणि यामुळे पावसाळ्यात झाडे मोठया प्रमाणावर वाढून हे पर्यटनस्थळ हरित आणि थंड वातावरणात दिसेल यासाठी वनखात्याने लक्ष केंद्रित केले आहे. ज्या ठिकाणी काही होटेल धारकांनी वनखात्याच्या जागेत अतिक्रमण केलेले आहे किंवा वनखात्याच्या जागेचा वापर होत असेल त्या जागा वनखाते आपल्या ताब्यात घेऊन त्या जागेचे सुशोभीकरण लवकरच केले जाणार आहे. याहीवर्षी पावसाळ्यात चांगल्या प्रकारे वृक्षारोपण करून त्या रोपांची निगा राखली जाणार आहे.असेही वनपाल आर. आडे यांनी सांगितले.