माथेरान (मुकुंद रांजाणे) : नेहमीच पर्यटकांना भुरळ घालणारी नेरळ ते माथेरान दरम्यान धावणाऱ्या मिनिट्रेनच्या केवळ दोनच फेऱ्या केल्यामुळे अनेकांना ही सेवा उपलब्ध होत नाही. यासाठी रेल्वे प्रशासनाने जर स्वतःला याबाबत काहीएक स्वारस्य नसेल तर एखाद्या खाजगी कंपनीला वार्षिक भाडेतत्त्वावर दिल्यास निदान पर्यटकांना सुरळीत सेवा उपलब्ध होऊ शकते. असे स्थानिकांसह पर्यटकांमधून बोलले जात आहे.
मिनिट्रेन हेच एकमेव मुख्य आकर्षण असल्यामुळे देशविदेशातील पर्यटकांना माथेरानमध्ये यावेसे वाटते परंतु नेरळ ते माथेरान दरम्यान केवळ दोनच फेर्या सुरू असल्याने अनेकांना तिकीट उपलब्ध होत नाहीत परिणामी त्यांना खाजगी वाहनांचा आधार घेऊन माथेरान गाठावे लागत असल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांच्या बाबतीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खासकरून मिनिट्रेनच्याच आकर्षणामुळे इथे पर्यटक येत असतात परंतु तिकिटा अभावी या गाडीचा आनंद त्यांना घेता येत नसल्याने त्यांचा पुरता हिरमोड होत आहे. काही वर्षांपूर्वी मिनिट्रेनच्या माध्यमातून सर्वांनाच चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या परंतु नेरळ ते माथेरान अशा दोनच फेऱ्या असल्याने पर्यटकांनी इकडे पाठ फिरवली आहे.
अमन लॉज ते माथेरान या मार्गावर शटल सेवा सुरू आहे. त्यातही तीन बोग्या सर्वसाधारण, एक फर्स्ट क्लास आणि दोन मालवाहू बोग्या असतात एका बोगीत तीस प्रवासी प्रमाणे चार बोग्यात जेमतेम शंभर प्रवासी वाहतूक होते आणि विशेष म्हणजे या शटलला घाट सेक्शन नसताना सुध्दा दोन इंजिन्स लावण्यात येतात आणि नेरळ ते माथेरान ह्या अवघड चढावावर एक इंजिन पाच बोग्या घेऊन येते. एकीकडे रेल्वेचे अधिकारी इंजिन कमी असल्याने नेरळ ते माथेरान साठी दोन फेऱ्या केल्या आहेत असे सांगितले जाते. मिनिट्रेनच्या माध्यमातून भरीव उत्पन्न प्राप्त होत असताना देखील अधिकारी वर्ग हेतुपुरस्सर या सेवेकडे दुर्लक्ष करत आहेत असे स्थानिकांमधून बोलले जात आहे. दस्तुरी नाक्यावर मोठया प्रमाणावर इमारतीचे साहित्य असते त्यासाठी मालगाडी सुरू केल्यास सर्वांना वेळेत आणि स्वस्त दरात वाहतुकीची सुविधा उपलब्ध होऊन रेल्वेच्या उत्पन्नात मोठया प्रमाणावर भर पडू शकते असेही बोलले जात आहे.
———————————————————
सर आदमजी पिरभोय पितापुत्रांनी माथेरानमध्ये पर्यटन वाढावे यासाठी स्वखर्चाने ही गाडी सुरू करून सेंट्रल रेल्वेकडे सुपूर्द केली होती. त्यामुळेच याठिकाणी आजही पर्यटकांना हे स्थळ केवळ मिनिट्रेन मुळे खुणावत असते. याचे गांभीर्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना नसल्याने रेल्वे प्रशासनाने ही गाडी रिलायन्स, टाटा अथवा अन्य कंपनीकडे भाडेतत्त्वावर दिल्यास पर्यटकांना आणि स्थानिकांना योग्यप्रकारे सुविधा निर्माण होऊ शकते.
——————————————————–
दरवर्षी आम्ही न चुकता माथेरानला येतो. मिनिट्रेन मध्ये बसण्याची मुलांची हौस असते पण नेरळ मध्ये ऐन सुट्टयांच्या हंगामात तिकीट उपलब्ध होत नाहीत. फक्त दोन फेऱ्या असतात मग शेवटी नाईलाज म्हणून खाजगी वाहनाने यावे लागते त्यासाठी रेल्वेने या मार्गावर फेऱ्या वाढवाव्यात.
—दीनदयाळ चतुर्वेदी, पर्यटक बंगलोर
——————————————————–
माथेरानच्या मिनिट्रेनला 100 वर्षापासूनचा इतिहास जरी असला तरी अधिकारी व ठेकेदार वर्गाची सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी बनविली आहे. मागील अनेक वर्षांपासून नेरळ माथेरान गाडी पूर्ण क्षमतेने चालवीत नाही. तसेच आर्थिक फायदा गुडस ट्रेन चालविली तर होईल पण ती मानसिकताच मुळात अधिकारी वर्गात दिसत नाही हे दुर्भाग्य म्हणावे लागेल.