माथेरान साठी ई-रिक्षा वरदानच

matheran-e-riksha
माथेरान (मुकुंद रांजाणे) : क्षणभंगुर मर्यादित आयुष्यातील जीवनात केवळ वर्तमानाचा विचार करून चालत नाही तर धावत्या युगाप्रमाणे स्वतःच्या इच्छाशक्ती आणि सध्याच्या भौगोलिक परिस्थितीचा साधक-बाधक विचार करून स्वतःमध्ये आणि आपल्या परंपरागत पिढ्यानपिढ्या रुळलेल्या व्यवसायाला बाजूला सारून ज्यातून केलेल्या कष्टाचे चीज होऊ शकते. अन व्यावासायिक दृष्टीने स्वाभिमानी बनून ताठ मानेने आपल्या नव्या व्यवसायात परिवर्तन घडवून आणण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणाऱ्या श्रमिक हातरीक्षा चालकांना मानाचा मुजरा करावा लागेल यात शंकाच नाही.
एखादी नवीन घटना आणि बदल घडवून आणण्यासाठी जुन्या काळातील रूढींना वेळप्रसंगी जर का तिलांजली दिली नाही, तर जुन्याच राहाटगाड्यात आयुष्य कधी एकदाचे संपून जाते याचे भान सुध्दा रहात नाही आणि शेवटी पूर्वापार चालत आलेल्या व्यवसायात एकएक पिढी व्यसनाधीन होऊन अक्षरशः लयास गेलेली माथेरान करांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आहे.
हातरीक्षा ओढणे हा काही फार मोठा व्यवसाय नाही तर इथले स्थानिक आणि त्यांच्या जोडीला अन्य ठिकाणांहून आलेले कष्टकरी श्रमिक हे नाईलाजाने ह्या व्यवसायात गुरफटून गेले होते त्यांना आशेचा किरण दिसत नव्हता की या अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी सुटका कशाप्रकारे होईल याबाबत सुतराम कल्पना नव्हती रक्ताचे पाणी करून पहाटेपासून ते रात्रीपर्यंत हातरीक्षा ओढून व्यसन केल्याशिवाय झोप येणार नाही अशीच परिस्थिती या श्रमिकांची झाली होती.
त्यांनाही सन्मानाचे जीवन जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती होती. त्यावेळी सध्याचे निवृत्त शिक्षक सामाजिक कार्यकर्ते सुनील रामचंद्र शिंदे यांना ही अमानवीय प्रथा भावली नाही, या सर्व श्रमिकांना ब्रिटिश कालीन गुलामगिरी मधून मुक्तता मिळवून देण्यासाठी मुळात हा व्यवसाय बदलला पाहिजे. माथेरान हे पर्यावरण दृष्टीने संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यामुळे आणि त्यातच इथे कोणत्याही प्रकारच्या मोटार वाहनांना बंदी असल्याने पर्यावरण पूरक ई रिक्षा हाच एकमेव पर्याय उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी सुनील शिंदेंनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू केला परंतु इको सेन्सेटिव्ह झोन या ठिकाणाला असल्याने त्यांच्या या प्रश्नांची उकल कुणीही घेत नव्हते. सर्वानी हात वर केले होते.
बहुतांश मंत्री महोदयांनी सुध्दा हे ई रिक्षाचे प्रकरण खूपच किचकट असल्याने आणि इको सेन्सेटिव्ह झोन मुळे मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते. इथले शालेय विद्यार्थी जवळपास तीन ते चार किलोमीटर पायपीट करून पालकांना दप्तराचे ओझे घेऊन शाळेपर्यंत जावे लागते,अपंग, रुग्ण त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध व्हावी जे वयोवृध्द पर्यटक आहेत ज्यांना अनेक वर्षांपासून माथेरान पाहण्याची इच्छा होती त्यांना या स्थळाची माहिती व्हावी यासाठी तत्कालीन आमदार जोगेंद्र कवाडे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी कवाडे यांनी अनेकदा विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता तर कर्जत खालापूर मतदार संघाचे तत्कालीन आमदार सुरेश लाड यांनीही काहीवेळा हाच प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.
याबाबत सुनील शिंदेंनी आपल्या मित्रांसह नागपूर येथे जाऊन तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांची सुध्दा भेट घेतली होती. अखेरीस या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता मिळावी आणि माथेरानच्या श्रमिकांना या अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली काही वर्षे यासाठी थांबावे लागले. शेवटी सुप्रीम कोर्टाने माथेरान मधील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन इथे प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी ई रिक्षा सुरू करावी असे निर्देश दिल्यावरून नुकताच डिसेंबर 2022 मध्ये ई रिक्षा धावत आहे.
माथेरानमध्ये एक अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे. सुरुवातीला कोणत्याही चांगल्या कामाला विरोध होतोच यात वाद नाही, परंतु कालांतराने याच सेवेचा स्वीकार सर्वांना करावा लागणार आहे हे सुध्दा नाकारता येणार नाही. ई रिक्षा मुळे बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत आणि त्यांनाही सन्मानाचे जीवन जगता येणार आहे. या रिक्षांची संख्या सुध्दा मर्यादित असून फक्त ९४ रिक्षा याठिकाणी धावणार आहेत. मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यापासून गावात येण्यासाठी नागरिकांना, पर्यटकांना ३५ रुपये एवढे नाममात्र भाडे आहे. तर शालेय विद्यार्थ्यांना केवळ पाच रुपये भाडे असणार आहे.
या सेवेमुळे याठिकाणी आगामी काळात मोठया प्रमाणावर पर्यटकांची संख्या निश्चितपणे वाढणार असून सर्वानाच रोजगार निर्मिती होण्याची चिन्हे दिसत आहेत. पर्यटकांची वाहतूक करणारे स्थानिक व्यवसायिक दस्तुरी नाक्यावर व्यवसाय करत नाहीत त्यामुळे गावातून पॉइंट्स साठी याच स्थानिकांना व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे.
ई रिक्षा सारख्या महत्वपूर्ण प्रकल्पाला राजकीय पक्षांकडून पाठिंबा दिला जात नाही. काही राजकीय पक्षांची मंडळी सुध्दा दिशाभूल करून विकासाला अडचणी निर्माण करण्यात मशहूर दिसत आहेत त्यांना मतांच्या लालसेपोटी फक्त नगरपरिषदेच्या सभागृहात जाऊन सत्ता उपभोगायची आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही राजकीय मंडळी कार्यरत नसून सत्तेचा लाभ कशाप्रकारे घेता येईल यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत.
—————————–
माथेरानमध्ये ब्रिटिश काळा पासून हात रिक्षाची प्रथा सुरू आहे ती  तशीच रहावी असा विचार करणारा एक गट आजही कार्यरत आहे. श्रमिकांच्या रक्ताचे होणारे पाणी याची त्यांना पर्वा नाही येथील  हे लोक ई रिक्षा विरोधात अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत असतात. ई रिक्षा मुळे 1500 कुटुंब उध्वस्त होतील अशी खोटी माहिती पसरवतात. परंतु सत्य  वस्तुस्थितीत माथेरानला फक्त 935 कुटुंब आहेत. ई रिक्षाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने या विरोधात दाद त्यांनी न्यायालयात गेले पाहिजे न्यायालयाचा सन्मान प्रत्येक नागरिक करीत असतो.
—सुनील शिंदे, याचिकाकर्ते,सामाजिक कार्यकर्ते माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *