ठाणे : कोविड विलगीकरण केंद्रात एका महिलेचे लैगिक शोषण करण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदर पूर्व भागातील गोल्डन नेस्ट परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन महिन्यानंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्या अंतर्गत नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने तिच्या बहिणीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला आणि तिच्या परिवाराला २४ मे रोजी कोविड विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्याच दरम्यान बहिणीचा मृत्यू झाल्याने आणि इतर सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र भाचीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असल्याने ही महिला काही दिवस भाचीसाठी कोविड विलगीकरण केंद्रात राहत होती. या काळात कोविड केंद्रातील सुरक्षा रक्षकाने महिलेच्या बाळाला आणि भाचीला दुधात गुंगीचे औषधं टाकून दिले. त्यानंतर काही काळाने तोच सुरक्षा रक्षक पाणी देण्याच्या कारणामुळे खोलीत आला व आपले लैगिक शोषण केले असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
कोणालाही काही सांगितले तर तिच्या बाळाला जीवे मारण्याची तसेच नातेवाईकांना कोविड रुग्णालयात दाखल करण्याची धमकी त्याने दिली होती. या प्रकरणात नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली आहे.