मुंबईत रात्रभर पावसाचा जोर, दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : रात्रभर मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर आहे. कुर्ला, दादर, सायन, किंग्ज सर्कल याठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मुंबईसह उपनगरात आज आणि उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची इशारा दिला आहे. सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या 3 तुकड्यांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी, शिक्षण खाते, आरोग्य खाते यांच्या समन्वय अधिका-यांना मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.