मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

अलिबाग : गणरायाच्या आगमनापूर्वी आणि नंतर कोकणातील चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्याप्रमाणात प्रवास करत असल्याने महामार्गावरील वाहतूकीत प्रचंड वाढ होत असते. यासाठी दरवर्षी गणेशोत्सवात काही दिवस अवजड वाहनांना बंदी करण्यात येते. यावर्षीसुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई येथून हजारो चाकरमानी आपल्या वाहनांनी कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी निघणार आहेत, त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरिक्षत व्हावा, याकरिता महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे रायगड पोलिसांकडून अवजड वाहन बंदी आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार, 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजेपर्यंत 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीस पूर्ण वेळ बंदी राहणार आहे. तर गौरी-गणपती विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 29 ऑगस्ट रोजी सकाळी वाजेपर्यंत 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहतूक पूर्णवेळ बंद राहील.

1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाची वाहतूक दिवसा बंद राहील, तर रात्री सुरू राहणार आहे. 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते 2 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाळू, रेती व तत्सम गौणखनिज वाहतुकीस पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे.