पोलादपूर (शैलेश पालकर) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे मोठया प्रमाणात वाढत असताना गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याच्या राजकीय आदेशानंतर एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीने तातडीची खड्डे बुजवणी सुरू केली असून यासाठी चक्क मातीची ढेकळं वापरली जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून जाणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांसाठी इपास काढण्याची सक्ती नसल्याचे जाहिर होऊनही वाहतूक मंदावलेली दिसून येत आहे तर खासगी वाहनांसाठी इपास सक्ती कायम असल्याने महामार्गावर वाहनांचा शुकशुकाट दिसून आला.
पोलादपूर तालुक्यात एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीने पाचशे मीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्यामध्ये दोनशे मीटर डांबरी रस्त्याचे जोड केले असून या अंतरामध्ये खड्डयांची संख्या आणि आकार वाहनांना दणके बसण्याइतपत तीव्र आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार, खासदार आणि मंत्री यांचे दरवर्षी पहाणी दौरे सुरू झाले की राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने खड्डे बुजविण्याचे आदेश दिले जातात, तसे आदेश यंदाही ठिकठिकाणच्या दौऱ्यावेळी देण्यात आले. यामुळे गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना भररस्त्यावर या खड्डे बुजवणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
यासाठी एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीने एका डंपरमधून लाल मातीची ढेकळं एका जेसीबीने खड्डयांवर पसरून जेसीबीनेच ठोकून आवश्यक असल्यास रोडरोलर फिरवून खड्डे बुजविण्याचे तंत्र अवलंबिले आहे. यादरम्यान, पावसाची सर आल्यावर त्याजागी लगेच मातीच्या ढेकळांचा चिखल होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, तोपर्यंत खड्डेबुजवणीचे काम पुढच्या खड्डयापर्यंत पोहोचलेले असल्याने मागच्या खड्डयातील मातीचा चिखल होऊन वाहून गेल्याने तेथे पुन्हा खड्डा तयार झाल्याचे सोयरसुतक एलऍण्डटी या ठेकेदार कंपनीच्या कामगारांना नसते हे उघडपणे दिसून आले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या तुलनेत खासगी वाहनांची संख्या खुपच रोडावली असून यामागे इपास आणि जिल्हाबंदीचे आदेश कारणीभूत असल्याचे दिसून आले. नाकाबंदीठिकाणच्या शेकहॅण्डमुळे या सर्व कागदोपत्री प्रक्रियेची आवश्यकता नसल्याचे काही सराईत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनधारकांचे मत असले तरी सर्वसामान्यांना सहकुटूंब प्रवास करताना शेकहॅण्डचा खेळ परवडणारा तसेच मनाविरूध्द असल्याने या भानगडीत पडण्याऐवजी अनेकांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील निवासस्थाने अद्याप सोडलेली नाहीत. पोलादपूर आणि महाड तालुक्यातील अनेकांची सोयरिक लगतच्या पुणे, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असल्याने त्यांना नातेवाईकांना लॉकडाऊन काळात भेटणे शक्य झाले नव्हते आणि आताही इपास तसेच जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर अगदी जवळ असूनही भेटणे अशक्य असल्याचे शल्य दिसून येत आहे. एस.टी.प्रवास करणाऱ्यांना इपास आवश्यक नाही आणि खासगी प्रवासासाठी इपासची सक्ती या अनाकलनीय निर्णयामुळे सरकारी निर्णयाबाबत कमालीचा संताप व्यक्त होत आहे.