मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिवावर अखेर कारवाईचा बडगा : आदर्श कर्मचारी पुरस्कार स्थगित

मुंबई : येस बँकमध्ये 140 कोटीच्या ठेवी ठेवल्याप्रकरणी वादात अडकलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिवावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कर्मचाऱ्य़ाला कारणे दाखवा नोटीस बजावित सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने आज झालेल्या सिनेट सभेत दिली. तर या कर्मचाऱ्य़ाला देण्यात येणारा ‘आदर्श कर्मचारी’ पुरस्कार स्थगित करण्यात आल्याचे देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन सिनेट सभा मंगळवारी पार पडली. या सभेत वरील माहिती देण्यात आलेली आहे. मुंबई विद्यापीठाच्या येस बँकमध्ये 140 कोटींच्या ठेवलेल्या ठेवीचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर त्यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आज पटलावर ठेवण्यात आला. यावेळी युवा सेनेसह इतर सर्व सिनेट सदस्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला. महाराष्ट्र पब्लिक युनिर्व्हसिटी ऍक्ट 2016 मधील कलम 94 (2) अंतर्गत गठीत केलेल्या समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. 140 कोटींच्या ठेवीचा प्रकार घडत असताना फायनान्स आणि अकाउंट समिती शांत का होती, हे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी चौकशी टप्पा म्हणजेच संबंधित व्यक्तीवर एफआयआर नोंदवून त्याच्याकडून या प्रकरणांमध्ये कोण कोण व्यक्ती समाविष्ट आहेत यांचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून यातील अधिक सत्य बाहेर काढावे अशी मागणी केली. तसेच संबंधित व्यक्तीला जाहीर करण्यात आलेला आदर्श कर्मचारी पुरस्कारही स्थगित करण्यास सदस्यांनी भाग पाडले. त्यानुसार विद्यापीठाने हा पुरस्कार स्थगित करीत असल्याचे जाहीर केले आहे.