मुरुड : काशीद समुद्रकिनारी सुट्टीच्या दिवसात किमान एका दिवसाला दहा हजारपेक्षा जास्त पर्यटक येत असतात. मुंबईहून काशीदला येताना प्रवासात किमान तीन तास वाया जात होते. प्रवासाचे अंतर कमी व्हावे व मुंबईतील पर्यटकांना थेट काशीद या ठिकाणी रो-रो सेवा अथवा पॅसेंजर जेट्टीद्वारे जलद गतीने पोहोचता यावे यासाठी सन २०१८ साली केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत काशीद येथे मोठी जेट्टी विकसित करण्यासाठी मान्यता मिळून निधी प्राप्त झाला. सध्या जेट्टीच्या कामाला जोरदार सुरुवात झालेली असून २०२१ च्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून देण्यात आली आहे.
काशीदच्या किनाऱ्यावर पर्यटकांना जाता यावे, यासाठी त्या ठिकाणच्या समुद्राच्या लाटा थोपविण्यासाठी २०१८ ला आवश्यक ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी, पॅसेंजर जेट्टी निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाला पाठविण्यात आला होता. त्याला केंद्रीय पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प रखडला होता. या कामाची सुरुवात झाली असून वर्षअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा सागरी महामंडळाचा प्रयत्न आहे.
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारा हे ठिकाण आंतराष्ट्रीय ठिकाणात समाविष्ट झाल्याने येथे दरवर्षी देशी-विदेशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी वर्षाला सात लाखापेक्षा जास्त पर्यटक भेटी देत असतात. सध्या काशीद येथे येणारे पर्यटक मुंबई येथून मांडवा व वाहनाने अलिबाग मार्गे काशीद या ठिकाणी पोहोचत असतात. काशीद या ठिकाणी थेट जेट्टीची व रो-रो सेवेची व्यवस्था केल्यामुळे मांडवा येथील गर्दी आपोआप कमी होऊन प्रवास करताना होणारी गर्दी कमी होणार आहे. मुंबई, ठाणे, बोरिवली, विरार, कल्याण आदी भागातील लोकांना थेट काशीद गाठल्याने रस्त्यावरील प्रवासाचे किमान तीन तासाची बचत होणार आहे. मुंबई ते काशीद बोट प्रवास अवघ्या दोन तासात सुलभ होणार असल्याने असंख्य पर्यटकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.