कर्जत (गणेश पवार) : नेरळ येथे शासनाचे आदिवासी विकास विभागाचे मुलींचे वसतिगृह आहे. त्या वसतिगृहात ४७ मुली निवासी शिक्षण घेत आहेत. त्या आदिवासी मुलींसाठी शासनाने बंद असलेल्या इमारतीवर पाणी गरम करणारे सोलर पॅनल बसविले आहेत. मात्र दीड वर्षे ते सोलर पॅनल बंद अवस्थेत असून निवासी शिक्षण ४७मुलींना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. दरम्यान, याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली असून हा प्रकार थांबला नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे. तेथे राहून शिक्षण घेण्याची संधी असून रायगड विभागाचे हे वसतिगृह आदिवासी समाजातील मुलींसाठी मागील दोन वर्षांपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. नेरळ येथे कर्जत तालुक्यासाठी असलेल्या या वसतिगृहात अन्य जिल्ह्यातील देखील मुली निवासी शिक्षण घेत आहेत. सध्या त्या ठिकाणी ४७ मुली वसतीगृहाचा वापर करीत असून त्यांच्या देखभालीसाठी तेथे आदिवासी विकास विभागाचे अधीक्षक तसेच जेवण बनविणारी मंडळी तसेच सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. त्या ठिकाणी राहून शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाणाऱ्या मुलींना सध्याच्या सुरु असलेल्या कडाक्याच्या थंडी मध्ये थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे .त्या ठिकाणी गरम पाणी करणारी सोलर यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र ती यंत्रणा बंद असून गेल्या दीड वर्षांपासून ती सोलर यंत्रणा काम करीत नाही.त्याचा परिणाम तेथे राहणाऱ्या मुलींना बाराही महिने गरम पाणी मिळत नाही.
याबाबत नेरळ येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यांनतर पक्षाचे शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर यांनी पक्षाचे उप तालुका प्रमुख सुरेश गोमारे आणि उपशहर प्रमुख संतोष सारंग यांच्यासह पाहणी केली असता परिस्थितीत सत्यता आढळून आली होती. त्यानंतर आज १२ जानेवारी रोजी नेरळ येथील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या आदिवासी वसतिगृह येथे पोहचल्या. कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती आणि महिला आघाडीच्या शहर संघटक सुजाता मनवे, कर्जत तालुका सांघटक सुमन लोंगले, पंचायत समिती गणाच्या विभाग संघटक कल्पना चव्हाण,नेरळ शहर युवती अध्यक्षा रेश्मा शिंदे आणि युवती सेने शाखा अधिकारी प्राची मनवे यांनी तेथील अधीक्षक एस एस जोहरे यांची भेट घेतली.
मुलीनाबद्दल होत असलेल्या समस्यांबाबत निवेदन सादर करीत सर्व अडचणी दूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी शहर प्रमुख क्षीरसागर तसेच उपतालुका प्रमुख गोमारे,उप शहर प्रमुख सारंग आदी देखील महिला आघाडीच्या सोबत उपस्थित होते.
—————————————-
सदर इमारतीचे काम आदिवासी विकास विभागाच्या नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. बांधकाम पूर्ण झल्यानंतर इमारतीचे हस्तांतरण करताना अटी शर्थी ठेवून इमारत ताब्यात घेण्यात आली होती. त्यामुळे सोलर बद्दल काम राहून गेले होते, मात्र आजच संबंधित सोलर पॅनल ची दुरुस्ती करण्यासाठी कनिष्ठ अभियानात नेरळ येथे पाठविण्यात आला आहे.
—शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी- पेण
—————————————-
संबंधित सोलर पॅनल बद्दल आम्ही अनेक वेळा प्रकल्प कार्यालयाला तसेच संबंधित इमारतीचे काम करणाऱ्या ठेकेदरला कळविले होते. मात्र आजच दुरुस्तीच्या कामासाठी कनिष्ठ अभियानात पोहचले असून उद्या पर्यंत हि यंत्रणा कार्यन्वित होईल.