मोटारसायकल अपघातात नागोठण्यातील तरुणाचा मृत्यू

mahesh4

नागोठणे (महेश पवार) : मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात नागोठणे कोळीवाड्यातील सचिन सखाराम मपारी (वय ३०) या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने नागोठणे कोळीवाड्यावर शोककळा पसरली असून सचिन या होतकरू तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात नागोठणे पोलिस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार वरवठणे येथील हितेश पाटील याच्या यमाहा मोटारसायकलवर मागे बसून सचिन हा त्याच्यासोबत नागोठण्यात येत होता. वनखात्याच्या नागोठण्यातील कार्यालयासमोरील रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोटारसायकल घसरल्याने मागे बसलेला सचिन मपारी याच्या डोक्याला व शरीरास मोठ्या जखमा झाल्या. हा अपघात गुरूवारी (दि.१८) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाता नंतर सचिन यास पुढील उपचारासाठी पनवेल येथील रूग्णालयात नेण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक जी.डी. कदम हे पुढील तपास करीत आहेत.