मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाचे मंत्री बच्चू कडू यांनी मोठया मनाने केले स्वागत

अमरावती : अन्नधान्य भाजी पाला व फळांची वाहतूक करणारी देशातली पहिली किसान रेल्वे सेवा सुरु झाली आहे. हि रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा नाशिकजवळच्या देवळाली ते बिहारमधल्या दानापूर स्थानकापर्यंत जाणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार या रेल्वेसेवेचा प्रारंभ केल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. हि रेल्वेगाडी आज देवळाली स्थानकावरून निघून सुमारे ३२ तासांनी दानापूर इथं पोहोचेल.

पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप (PPP) याद्वारे कोल्ड चेन आणि शेतमालाची वाहतूक व विक्री करण्याची ही सेवा असणार आहे. कोल्ड सप्लाय चेन सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पहिली रेल्वे महाराष्ट्र व बिहार या दोन राज्यांतील शेतकऱ्यांना जोडणार आहे.

रेल्वेद्वारे अन्नधान्य, भाजीपाला व फळे यांची वाहतूक योग्य पद्धतीने करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार पहिल्या ट्रेनद्वारे नाशिक भागातील कांदा पटना, इलाहाबाद, कटनी, सतना या शहरात आणि त्या भागात पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे.

या रेल्वेसेवेचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली असून नाशिक, मनमाड, भुसावळ इत्यादी परिसरातल्या फळे, फुले, कांदा तसंच भाजी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. यासाठी नाशिक जवळच्या लासलगाव इथं तापमान नियंत्रित गोदाम बांधण्याचे काम सुरु झालं आहे. दरम्यान, किसान रेल्वे योजना सुरु केल्याबद्दल रविवारी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.