‘यांच्या’ प्रयत्नातून नगरपंचायत हद्दीत प्रथमच तीन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

palkar11

पोलादपूर (शैलेश पालकर) : नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या पाठपुराव्याने पोलादपूर नगरपंचायत हद्दीत प्रथमच तीन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी विविध प्रभागांतून करण्यात करण्यात आला.

नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेतून वैशिष्ठयपूर्ण अनुदान योजनेतून प्राप्त झालेल्या 3 कोटी रूपयांच्या कामाचा शुभारंभ आ.भरत गोगावले यांच्याहस्ते पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील आनंदनगर येथे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या आमदारनिधीतून बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याच्या पुनर्बांधणीचा दि. 25 जानेवारी रोजी रात्री श्रीफळ वाढवून करण्यात आला. यानंतर उर्वरित कामांचा शुभारंभ शनिवार, दि. 30 जानेवारी रोजी सायंकाळी पार्टेकोंड रस्त्यापासून सुरू झाला.

यावेळी आ.गोगावले यांच्यासह तालुकाप्रमुख निलेश अहिरे, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, जिल्हा महिला आघाडीप्रमुख वैशाली भूतकर, माजी नगराध्यक्षा सुनिता पार्टे, शहरप्रमुख सुरेश पवार तसेच माजी नगराध्यक्ष राजन पवार, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड गटनेते उमेश पवार, माजी नगराध्यक्ष निलेश सुतार, उपशहरप्रमुख राजन पाटणकर, गणपत उतेकर, आणि पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेले शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. यासोबतच मंगेश नगरकर, प्रसाद मोरे, मनोज प्रजापती, लक्ष्मण मोरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक प्रभागातील विविध मान्यवरदेखील भुमिपूजन कार्यक्रमात सहभागी झाले.

यामध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहाचे अद्ययावतीकरण करणे, राष्ट्रीय महामार्ग ते गोकुळनगर  मेनरोड डांबरीकरण रस्ता व 3 स्लॅब ड्रेनेज करणे, सैनिकनगर येथील 3 अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, रमेश जगताप ते लेप्रसी मिशनपर्यंत आरसीसी रस्ता करणे, शिवाजीनगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण व स्लॅब ड्रेनेज बांधणे, प्रभाग 4 मध्ये अंतर्गत रस्ते व गटारे बांधणे, प्रभाग 5 मध्ये अंतर्गत गटारे व रस्ता डांबरीकरण करणे, हनुमानगर येथील आरसीसी गटार बांधणे, प्रभाग 6 मध्ये अंतर्गत रस्ते व गटारे बांधणे, पार्टेकोंड मुख्यरस्ता डांबरीकरण करणे, सैनिकनगर येथे कासार यांच्या घरापासून पवार यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार करणे, गोकुळनगर अंतर्गत आरसीसी गटार बांधणे, स्मशानभूमी ते चरई पुल रस्त्यापर्यंत डांबरीकरण करणे आदी कामांचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी करण्यात आला.