यापुढे भारतातही खासगी कंपन्यांना लागू होणार चार दिवसांचा आठवडा!

pen11

नवी दिल्ली : भारतात नवीन कामगार कायद्यांची  येत्या काही दिवसांत अंमलबजावणी होणार आहे. तो नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर नोकरदारांना 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत कामगार कायद्याचा मसुद्या हा अंतिम टप्प्यात आहे. परंतु हा कामगार कायदा लागू झाल्यानंतर आपल्याला 8 तासांच्या ऐवजी 12 तास काम करावे लागण्याची शक्यता आहे. कामगार कायदा लागू झाल्यानंतर कामगारांच्या कामाचे दिवसाला 12 तास असतील. त्यासाठी कंपनी आणि कर्मचारी दोघांचीही सहमती आवश्यक असेल.

केंद्रीय कामगार मंत्रालय नव्या मसुद्यावर काम करत आहे. कामाची बदलणारी पद्धत पाहून कामांच्या वेळांमध्ये काही सुधारणा करण्याचे प्रयत्न आहेत. काही सवलती देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहितीसुद्धा केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्र यांनी दिली.

नव्या कायद्यानुसार 4 दिवस काम करून 3 दिवसांची सुट्टी घेता येणार आहे. परंतु असे करणे सक्तीचे नसेल. या पर्यायावर कंपनी आणि कर्मचारी दोघे मिळून निर्णय घेऊ शकतात. बहुतांश राज्यांनी त्यासाठी नियमावली तयार केली आहे. अंतिम मसुदा लवकरच तयार होईल, असे चंद्रा म्हणाले. याबाबतच्या शंका चर्चेतून सोडविण्यात आल्यात, असे अपूर्व चंद्र यांनी स्पष्ट केले.