यूपीएच्या कार्यकाळातील विमान खरेदी प्रकरण हातघाईवर

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) २००९  मध्ये खरेदी करण्यात आलेल्या ७५  पिलाटस प्रशिक्षक विमानांच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्याच्याशी निगडीत मनी लॉण्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी १४  ठिकाणी छापे टाकले.त्यामुळे केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असतानाच्या काळातील विमान खरेदी चौकशीच्या रडारवर आली आहे.

पिलाटस प्रकरण शस्त्रास्त्रांचा दलाल संजय भंडारी याच्याशी संबंधित आहे. त्या व्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. चौकशी पुढे नेण्याच्या उद्देशातून ईडीने दिल्लीतील डझनभर ठिकाणांवर छापे टाकले. त्याशिवाय, गुडगाव आणि सुरतमध्ये तशीच कारवाई करण्यात आली.

आयएएफसाठी प्रशिक्षक विमाने खरेदी करण्याच्या उद्देशातून २००९ मध्ये कंत्राटासाठीची प्रक्रिया जारी करण्यात आली. त्यानंतर तब्बल २  हजार ८९५  कोटी रूपयांचे कंत्राट स्वित्झर्लंडस्थित पिलाटस एअरक्राफ्ट लि. या कंपनीला मिळाले. त्याबदल्यात भंडारीला ३५०  कोटी रूपये कमिशन मिळाल्याचा आरोप आहे. त्यावरून सीबीआयने मागील वर्षी जूनमध्ये भंडारी, आयएएफचे अज्ञात अधिकारी, संरक्षण मंत्रालय आणि पिलाटस कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला.

संबंधित व्यवहारात संरक्षण सामग्री खरेदी प्रक्रियेच्या निकषांचा भंग झाल्याचा सीबीआयचा आरोप आहे.सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेऊन ईडीने चौकशी सुरू केली आहे. सध्या फरार असलेला भंडारी ब्रिटनमध्ये असल्याचा अंदाज आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी ईडीकडून पाऊले उचलली जाण्याची चिन्हे आहेत. भ्रष्टाचाराबरोबरच देश-विदेशात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या इतर प्रकरणांवरून ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा त्याच्यामागे आधीपासूनच लागला आहे.