येणाऱ्या काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल : पालकमंत्री आदिती तटकरे

alibag1

अलिबाग : समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे प्रजासत्ताकदिनाच्या 71 व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपविभागीय अधिकारी श्रीम.शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीम.उज्वला बाणखेले, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग राहुल मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.शितल पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार सचिन शेजाळ, सतिश कदम, विशाल दौंडकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, प्रविण बोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्तजिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधीत करताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, विविध धर्म, भाषा,प्रांत, संस्कृती जोपासणाऱ्या भारतीयांचा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश. भारतीय संविधानातील मूलतत्वे संविधानिक हक्क आणि कर्तव्य,स्वातंत्र्य भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत.आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदानात सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच स्वत:बरोबर इतर सहकाऱ्यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपले राज्य विविध आघाड्यांवर मार्गक्रमण करीत आहे. समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे.

त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्र हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविण्याचा संकल्प आपले आदरणीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं केला. या संकल्पपूर्तीसाठी मी देखील या जिल्ह्याची पालकमंत्री या नात्याने कटीबध्द आहे.

रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हास्तरावर जाणकार, अनुभवी व अभ्यासू अधिकारी यांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाची धोरणे, योजना व कायदे यांच्या अंमलबजावणीसाठी “अभ्यास गट” स्थापित करण्यासंबंधीचे निर्देश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

जिल्हा रुग्णालय येथे अद्ययावत 40 बेडचा कोविड आयसीयू कक्ष व 46 ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्यात आले. तर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यासाठी RT-PCR Lab चे सन्मानीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपेजी यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन करून लॅब सुरु करण्यात आली.

अलिबाग येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्नित रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली, त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथील जमीनही प्रदान करण्यात आली असून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरु होईल.

मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडीकल युनिटसह बोट अँम्बुलन्स सेवा कार्यान्वित करण्यासाठी यश आले आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे विशेष आभार मानून पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या,करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावरही विस्तार करण्यात आला. आजही गरजूंना केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यात झालेल्या विविध नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व निर्मूलनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथकाचा कायम स्वरुपी बेस कॅम्प जिल्ह्यात स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच तेथे कायम स्वरुपी बेस कॅम्प स्थापित होईल.

विजांमुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात कार्यान्वित असलेली  बसस्थानके तसेच ग्रामपंचायत असे मिळून एकूण 842 ठिकाणी तसेच रस्त्याच्या कडेला उभारण्यात येणाऱ्या नव्या 82 निवारा शेडमध्ये वीज प्रतिरोधक यंत्रे बसविण्याचा  निर्णय घेण्यात आला असून या कामाकरिता एकूण 8 कोटी 31 लक्ष रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र शासनाला मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगतच्या तालुक्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती उद्भवून मनुष्यहानी होवू नये, म्हणून उरण तालुक्यातील मोठी जुई, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली, मुरुड तालुक्यातील राजपुरी व अलिबाग तालुक्यातील आवास अशा एकूण 4 ठिकाणी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या गावांमधील सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करुन त्याचे रुपांतर चक्रीवादळ निवारा केंद्रात केले जाणार असून परिस्थितीनुरुप त्याचा वापर केला जाण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून स्वच्छ भारत मिशन विषयी बोलताना जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतीमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. यामध्ये शाश्वत स्वच्छतेसाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी, कचरामुक्त गाव, प्लास्टिकमुक्त गाव या संकल्पना राबविण्यावर भर दिला आहे. यासाठी नागरिकांनी, गृहनिर्माण सोसायट्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी विशेष सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील जनतेला केले.

तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सन 2020 मध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन चे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यामध्ये उरण तालुका हा राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याने याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच  या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत महिला व बाल कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषदेमार्फत आजपर्यंत 208 लाभार्थी मुलींना मुदतठेव प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाकरिता, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्याकरिता समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे, असे सांगून पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर राहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषी पंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 जाहीर केले आहे, रायगड जिल्ह्यात एकूण 14 हजार 995 कृषी पंप वीज ग्राहक आहेत, असे सांगून याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शेवटी गेले जवळपास 10 महिने आपण सगळेच या विषाणूशी सर्व शक्तीनिशी एकवटून लढतोय, त्यात यशस्वी देखील होतोय. आता कोविशिल्ड लसीकरण मोहीमही सुरु झाली आहे. “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेंतर्गत प्रत्येकाने आपली जबाबदारी समर्थपणे पेलली. मात्र ही जबाबदारी अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. म्हणूनच यापुढेही प्रत्येकाने सामाजिक सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर या चतुःसूत्रीचा दैनंदिन जीवनात अंगीकार केला तर आपण करोनापासून दोन हात नक्कीच लांब राहू शकतो, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणाल्या की,  कोविशिल्ड लसीकरण मोहीम सुरु होऊन आज परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही संकट पूर्णपणे टळलेलं नाही. योग्य काळजी, संयम, जिद्द आणि आत्मविश्वासाने आपण हे युद्ध नक्की जिंकू. सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित रहा.. शासन सदैव आपल्या सोबत आहे. तसेच सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात रायगड जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल.

यावेळी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले. या सोहळ्याचे सूत्रसंचलन श्रीमती करंदीकर यांनी केले. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सोहळयात उपस्थित सर्वांनी सॅनिटायझरचा वापर, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या सूचनांचे काटेकोर पालन करीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी  तसेच ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.