मुंबई : येत्या 48 तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह मुंबईत जोरदार पाऊस पडला. आता मुंबईसह कोकणात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईसह ठाणे, रायगड आणि संपूर्ण कोकणात पावसाने थैमान घातले होते. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा दमदार पाऊस झाला होता. मागचे दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली आणि आता पुन्हा मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. मुंबईतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे.