मुंबई : एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) ला रिया आणि काही ड्रग्ज पॅडलर्सच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून आणखी काही लोकांची चौकशी करण्यात आली. यातून अतिशय महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे लवकरच तपास एजन्सी असा खुलासा करू शकते, ज्यामुळे मुंबईसह गोव्याच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो, असा दावा एका वृत्तपत्राच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठे राजकारण आणले जाणार, अशी शंका अगोदरपासूनच व्यक्ती करण्यात येत होती. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण राजकारणाकडे खरोखर वळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर असे झाले तर मोठा राजकीय वादंग निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, गप्पी म्हणजेच ड्रग्ज पॅडलर फयाज अहमदला एनसीबीने गोव्यातून अटक केली होती. या गप्पीकडून मिळालेली माहिती महत्वाची असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ड्रग सिंडिकेटच्या मोठ्या सदस्यांना फयाजच्या समोर बसवून चौकशी केली जाऊ शकते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीत मुंबईतील अनेक मोठी नावे असल्याचे समजते.
एनसीबीने तयार केलेली ड्रग्ज पॅडलर आणि संशयितांची यादी आता मोठी होत चालली आहे. ड्रग सिंडिकेटच्या मोठ्या नावांशिवाय मुंबई आणि गोव्यातील लोकल गप्पीसुद्धा एनसीबीच्या निशाण्यावर आहेत. मुंबईमध्ये अशा अनेक राजकीय नेत्यांची नावे सुद्धा या सिंडिकेटशी जोडली गेल्याचे बोलले जात आहे, ज्यांची नावे प्रसिद्ध होताच सत्तेच्या राजकारणात खळबळ उडू शकते, असे म्हटले जात आहे.