ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रिक अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालय समिती सभागृहामध्ये अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे, उपाध्यक्ष समिर भाटकर, ममन् दुर्गा महिला संघाच्या अध्यक्ष सोनल पाटील, जिल्हा समन्वय समिती उपध्याक्ष इंजि.अभि. मोहन पवार, सुदाम टावरे, मोहन पवार, डॉ. अविनाश भागवत यांसह अधिकारी महासंघाचे राज्य व जिल्हा कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना काळात कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या अधिकारी यांचा प्रातिनिधीक सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील विविध रुग्णालयातील डॉक्टर, महसुल विभागातील अधिकारी यांचा समावेश आहे.
यावेळी बोलतांना श्री कुलथे यांनी कोरोना काळात सर्व विभागाच्या अधिकारी यांनी केलेल्या ऊल्लेखनीय कार्याबद्दल कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. कल्याणसंघाच्या निर्मितीसाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी सर्व अधिकारी यांनी सहभाग द्यावे असे आवाहन श्री कुलथे यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. कोरोना काळात ठाणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.
यावेळी उपाध्यक्ष समीर भाटकर यांनी मार्गदर्शन केले. कोरोनाने आपल्याला जीवनाचे महत्व पटवून दिले. महासंघाने कोरोना कालावधीत आकस्मिक आजारात समावेश करण्याची कार्यवाही केली. 27 आजारात यांचा समावेश करण्यात आला आहे.
कोरोना कालावधीत कार्यरत अधिकाऱ्यांना एक बेसिक अथवा विशेष मानधन देण्याची मागणी ठाणे जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष डॉ शिवाजी पाटील यांनी केली आहे. त्या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री भाटकर यांनी दिले. राज्य कार्यकारीणी सदस्य सुदाम टावरे यांनी कल्याण केंद्राची वास्तु संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तारुलता धानके यांनी केले. बैठकीला जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.