राजे प्रतिष्ठान रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांची 300 वर्षे जुनी दहीहंडीची परंपरा चालू ठेवण्याची मागणी

पनवेल  :  गोपाळकाला व दहीहंडी  १२ ऑगस्ट २०२० रोजी साजरी होत आहे. पनवेलमध्ये सुमारे ३०० वर्षांपासून साजरी करत  असलेली दहीहंडी आहे. पेशवेकालीन बापट कुटुंबीयांची पिढी,  महाडिक – चव्हाण , भोईर कुटुंब  हा उत्सव पनवेलमधील रहिवाशांसह साजरा करतात.

या दहीहंडीला ऐतिहासिक महत्त्व असून, १७३० पासून हा सण परंपरेनुसार आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं. १७२० मध्ये बाळाजीपंत बापट आपल्या कुटुंबासह पनवेलमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी बापटवाडा या ठिकाणी पंढरपूरवरून आणलेल्या विठ्ठल मूर्तीची स्थापना केली होती. गोकुळाष्टमीच्या दिवशी आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या देव-देवतांची अभिषेक करून त्यांची सजावट केली जाते. आदल्या दिवशी रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम भजन, कीर्तन आयोजित केले जातात. पनवेल शहरात नवनाथाची शक्तिपीठ आहेत. त्या ठिकाणचे भक्त या उत्सवात सामील होऊन या ठिकाणच्या दहीहंडी फोडत असतात. विशेष म्हणजे येथील दहीहंडी ही मोठ्या उंचावर न बांधता ठरावीक उंचीवर दहीहंडी टांगून सर्व जण रिंगणामध्ये एकत्र येत असतात. गोलाकार जमलेल्या गोविंदांना जाड्या दोरखंडाने फटके मारले जातात. हा एक परंपरेचाच भाग असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ही दहीहंडी एका काठीने फोडली जाते. शेकडो वर्षे ही परंपरा सुरू असल्याने अनेक जण मोठ्या उत्साहात ही दहीहंडी बघण्यासाठी जमत असतात. उत्सव गोविंदांच्या जिवावर बेतू नये म्हणून करण्यात आलेले नियम आणि त्या नियमांचे पालन करून उत्सवाचे आयोजन करताना होणारी दमछाक या पार्श्र्वभूमीवर पनवेलमधील दहीहंडी वेगळी ठरते. चित्रपट कलाकारांची उपस्थिती, लाखोंची बक्षिसे आणि गगनाला भिडलेल्या हंडय़ांचा थरार असं काहीही न करता पनवेलमध्ये पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते. जवळपास 300 वर्षांपासून पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने दहीहंडी साजरी करतात. ‘देवांची हंडी’ असं या दहीहंडीला म्हणतात.

मात्र यंदा कोरोनाचे सावट आहे तरी फक्त हिंदूंच्या धार्मिक सणांवर बंधने घालायची कामे प्रशासनामार्फत केली जातात तरी आम्ही आपणास या पत्राद्वारे कळवू इच्छितो कि ३०० वर्षांपासून सुरु असलेल्या या देवांच्या दहीहंडीला कोणत्याही नियम व जाचक अटीं लावण्यात येऊ नये व तसे कोणतेही आदेश देण्यात येऊ नये अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी प्रशासनाद्वारे केली आहे. पनवेल महापालिकेडून जरी आदेश निघाले तरी राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल संपूर्ण नाथपंथीयांच्या मागे संपूर्ण ताकदीनिशी उभी असेल असा इशाराही केवल महाडिक यांनी प्रशासनाला दिला आहे.