राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीनचाकी, पण स्टिअरिंग माझ्याच हातात : उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीचा उत्तरार्ध प्रसिद्ध झाला. यामध्ये ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती आणि आपल्या भूमिकेबाबतचं चित्र स्पष्ट केलं. राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हे तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात, पण ते गरीबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. मी मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असा समज कुणी करून घेऊ नये. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको असंच आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले, सरकारला तीन चाकं, तीन चाकं म्हणून म्हणून संबोधताय, पण ही तीन चाकं चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखतंय. केंद्रात किती चाकं आहेत. आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचं सरकार आहे. सांगा ना, मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो तेव्हा तर ३०-३५ चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडीच होती.