आजपासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘टिलीमिली’ मालिका सुरु झाली आहे. सकाळी साडेसात वाजता आठवीच्या वर्गाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर साडेबारा वाजेपर्यंत ‘टिलीमिली’ मालिका सुरु होती. यात शेवटी पहिलीच्या वर्गातील मुलांना शिक्षण देण्यात आले. वर्गातील अभ्यासक्रम मुलांना आवडेल, अशा पद्धतीने वर्ग सुरु करण्यात आले आहेत.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन राज्यातील शाळा केव्हा सुरु करायच्या याबाबत अद्यापही ठाम निश्चय झाला नसला तरी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज अर्धा-अर्धा तास शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. आता पहिलीपासून आठवीपर्यंत सर्व मराठी माध्यमाच्या सह्याद्रीच्या ‘टिलीमिली’ मालिकेतून प्रसारण करण्यात येणार आहे. आठवीनंतर पुढचा वर्ग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि आवडीचा विचार करून ‘टिलीमिली’ असे मालिकेचे नाव देण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद आणि एमकेसीएल नॉलेज फांउंडेशन यांच्यामार्फत ही नवी शिक्षणविषयक मालिका सुरू केली गेली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास दीड कोटी मुलांना घरबसल्या अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. पहिली ते आठवीच्या वर्गातील धड्यावर आधारित या मालिकेचे प्रसारण करण्यात येणार आहे.
रविवारची सुट्टी आणि कंटाळवाणी व्याख्याने नाहीत !
लहान मुलांना आवडतील अशा पद्धतीने पाठ्यक्रम उलगडून दाखवण्यात येत आहे. यात कोणतीही व्याख्याने नाहीत. प्रत्येक धड्याचे चलचित्रित आणि आवाजाच्या माध्यमातून हे शिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे रविवारी मुलांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे शाळेत न जाताही शाळेत गेल्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळू शकतो.
दररोज प्रत्येक इयत्तेच्या एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे ६० पाठ ६० दिवसात ६० एपिसोडमध्ये सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे ६ दिवस हे एपिसोड प्रसारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे ‘टिलीमिली’ मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल. कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल.