नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे कोकण विभाग कार्यालय आज राज्याचे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त श्री. स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते सुरु झाले. हे कार्यालय कोकण भवन 7 वा मजला (विस्तार इमारत), नवी मुंबई 400614 येथे असेल. सदर कार्यक्रमासाठी श्रीमती मेधा गाडगीळ, सेवा हक्क आयुक्त, कोकण महसूली विभाग आणि श्री. अण्णासाहेब मिसाळ, विभागीय आयुक्त कोकण विभाग उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या अधिनियमान्वये 403 अधिसूचित सेवा ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात येतात. नागरिक आपले सरकार पोर्टल अथवा आरटीएस मोबाईल ॲपद्वारे तसेच त्यांच्या रहीवासानजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून या सेवांसाठी सहज अर्ज करु शकतात.
या सेवांसाठी कोकण महसूली विभागातून अद्यापपर्यंत 3 लाख 40 हजार 198 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 2 लाख 87 हजार 397 एवढे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण राज्यातून 36 लाख 64 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी माहिती लोकसेवा आयुक्त यांनी याप्रसंगी दिली. तसेच विभागीय आयुक्त यांनी अधिनस्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी इ.अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये लोकसेवा हक्क अधिनियमाखाली प्राप्त होणाऱ्या अर्ज व अपिलांचा निपटारा याबाबत आढावा घ्यावा व सदर अधिनियम अधिकाधिक लोकाभिमूख व्हावा यासाठी प्रचार, प्रसार मोहिम राबविण्याच्या सूचना क्षेत्रिय कार्यालयांना द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.