माणगांव (रविंद्र कुवेसकर) : अचानकपणे शनिवारी १७ डिसेंबरच्या रात्री पडला पाऊस. बरोबर रात्री ११.०६ वाजता सुरु झाला, जेमतेम सात ते आठ मिनीटेच माणगांव उतेखोल परिसरात अनपेक्षितपणे पडला पाऊस. पागोळी लागेल एवढाच रिमझीम ठिबकला.
परिसरात मातीचा सुगंध दरवळत रस्ते मात्र शिंपडले. अतिशय विचीत्र हवामान दिसुन येत आहे. रात्री मधेच उष्णता, सकाळी जरासे थंड, आता थंडी गुल्ल होऊन मधेच पाऊस पडल्याने आद्रता आणि उष्णता असे विचीत्र हवामान झाले आहे. कडधान्य पिकाला नुकसानकारक, आरोग्यास हानीकारक विचीत्र वातावरणाने बळीराजासह सर्वांनाच चिंता पडली आहे.
अनेक जण सर्दी, खोकला, नाक गळणे, अंगात कणकण अशा किरकोळ व्यांधींनी जर्जर(त्रस्त) झालेत. पुन्हा एकदा कोरोना संकटाच्या स्मृती जागल्या आहेत. ते तोंडावरचे मास्क, ते सतत हात धुणे, अंतर पाळणेची पुन्हा एकदा वेळ येते कि काय ! अशाच साथीच्या सर्दी खोकल्याची लागण मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे.
खरतर हा थंडीचा मोसम पण फारच कमी वेळा तो जाणवला आहे. आतातर नेहमीच संमिश्र हवामान, कधी मधुनच वारे वाहत उष्मा जाणवतो तर घटकेत थंडी. आणि आता डिसेंबरच्या उत्तरार्धात चक्क पाऊस ! कठीण आहे सारं अस लोक बोलताहेत.