नवी दिल्ली : अंबालात हवाई दलाच्या हवाई तळावर पाच राफेल विमाने दाखल झाल्यानंतर लढाऊ विमाने म्हणजे ‘गेम चेंजर’ असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. आपल्या हवाई हद्दीचे संरक्षण करण्यासाठी आपल्या हवाई योद्ध्यांना राफेल निश्चितच सहाय्य करेल असेही त्यांनी म्हटले आहे.
अमित शहा यांनी म्हटले, राफेल दाखल होण्याचा दिवस आपल्या भारतीय हवाई दलासाठी ऐतिहासिक दिवस आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. संपूर्ण देशासाठी हा सर्वात महत्वाचा दिवस असून या अत्याधुनिक विमानांचा समावेश म्हणजे भारत सामर्थ्यवान आणि सुरक्षित राष्ट्र करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धाराची खरी साक्ष आहे.
आकाशातले कोणतेही आव्हान पेलण्यासाठी राफेल जगातले सर्वोच्च सामर्थ्यवान आहे. वेगापासून ते शस्त्र सामर्थ्यापर्यंत राफेल सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. जागतिक दर्जाची ही लढाऊ विमाने गेम चेंजर ठरतील, असे शाह म्हणाले.
दरम्यान, माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांपी राफेल विमाने गेम चेंजर ठरतील असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. भारतापेक्षा अनेक पटीने लहान असणार्या काही देशांकडेसुद्धा राफेल विमाने असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.