रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका : संजय राऊत

मुंबई : ‘अयोध्येच्या आणि राम मंदिराच्या प्रश्नांवर मतं मागणं आता तरी थांबवा. रामाच्या हाती आणि मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका’, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपावर टिकास्त्र सोडले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा भूमीपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी भाजपाला सुनावताना म्हटले आहे की, राममंदिर जन्मभूमीचे राजकारण सदैव सुरुच राहिले. ते 5 ऑगस्टला तरी कायमचे संपावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्राकांड घडले. अयोध्येतून निघालेली साबरमती एक्सप्रेस गोध्रा स्थानकावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही गाडी पेटवण्यात आली, या संशयातून गुजरातमध्ये जो दंगा झाला तो सरळ हिंदू विरुद्ध मुसलमान असाच होता. या दंगलीने मोदी यांना आधी हिंदूंचे नेते आणि नंतर पंतप्रधान केले. म्हणजे या राजकीय चढाओढीतही राम आहेच.

या सदरात पुढे म्हटले आहे की, गुजरातमध्ये गोध्राकांड घडले नसते तर आजच्या मोदींचे स्थान आणि रुप आपल्याला पाहता आले नसते. अयोध्येनंतरच्या दंगलीने शिवसेना-भाजप युतीला सत्ता प्राप्त झाली. मुंबईसह महाराष्ट्रात तेव्हा हिंदुत्वाची लाट उसळली. तसे साबरमती एक्सप्रेसच्या गोध्राकांडानंतर पंतप्रधान मोदी हे हिंदुत्ववादी नेते म्हणून पक्के झाले.

यामध्ये राऊत यांनी भाजपावर टिका करताना म्हटले आहे की, राम मंदिर 28 वर्षांनी उभे राहील. या लढ्याने शरयू लाल झाली. शेवटी ज्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराचा निकाल दिला ते मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई भगवे झाले आणि राज्यसभेत पोहोचले. छत्रपती शिवाजीराजे आणि प्रभू श्रीराम या दोन विभूतींच्या नावाने जितके राजकारण गेल्या 30 वर्षांत झाले ते पाहिले की, आपण आजही श्रद्धा आणि भावनेच्या विषयांतच गुंतून पडलो आहोत याची खात्री पटते.

अयोध्या समस्या ही या देशापुढील जणू एकमेव समस्या बनली होती. सर्वांची शक्ती, वृत्तपत्रांचे रकाने त्यात खर्ची होत होते. ते आता थांबले. हे सर्व पंतप्रधान म्हणून मोदींच्या कारकीर्दीत घडले. पंतप्रधान पाकिस्तान, चीनच्या सीमेचा वाद मिटवू शकले नाहीत, पण अयोध्येतील सीमावाद त्यांनी मिटवला. त्याचे श्रेय न्यायालयाला द्यावे लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.