अलिबाग : जिल्हा प्रशासनाबरोबरच जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, व्यक्ती महाड येथील तारिक गार्डन या इमारतीच्या दुर्घटनेत अतीव नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करू इच्छितात, त्या सर्व कंपन्या, संस्था आणि व्यक्तींनी “जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड” या नावाने सुरु करण्यात आलेल्या बचतखात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव आणि मोहरम या महत्त्वाच्या सणांच्या निमित्ताने आपण या दुर्घटनाग्रस्तांना सढळ हाताने मदत करू शकता,आपल्याकडून पुढील पंधरा दिवसात या खात्यात जमा होणारा निधी हा महाड दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठीच वापरला जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत दि.24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील एकूण 41 सदनिकांमध्ये राहत असलेले सर्वच नागरिक बेघर झाले असून यापैकी 9 जण जखमी तर 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाकडूनही दुर्घटनाग्रस्तांना तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.
याशिवाय या दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना अधिक मदत मिळण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अलिबाग येथे उघडण्यात आले असून त्याचा बचत खाते क्रमांक 38222872300 आहे.
या बचतखात्याची माहिती पुढीलप्रमाणे–
जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड
(DISTRICT DISASTER RESPONSE FUND)
AC NO.:-38222872300
STATE BANK OF INDIA
IFSC CODE:- SBIN0000308