रायगडकरांसाठी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’, केंद्रीय युवा व क्रिडा मंत्रालयातर्फे आयोजन

अलिबाग : केंद्रीय युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पुढाकार घेवून “फिट इंडिया फ्रीडम रन” हा नवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.या पार्श्वभूमीवर “फिट इंडिया फ्रीडम रन” हा उपक्रम रायगड जिल्ह्यात सर्वत्र शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, क्रीडा मंडळे, तसेच सर्व नागरिकांच्या व्यापक स्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड व रायगड जिल्ह्यातील एकविध खेळ संघटना यांच्याकडून संयुक्तरित्या दि.29 ऑगस्ट 2020 रोजी राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमामध्ये इच्छुक नागरिक कोठेही, कधीही धावू / चालू शकतात किंवा सायकलिंग करु शकतात, अशी या उपक्रमामागील संकल्पना आहे.

प्रत्येक जण धावण्यासाठी /चालण्यासाठी/ सायकलिंगसाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीश: अनुकूल वेळ व ठिकाण निवडू शकताे. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेवून धावणे / चालणे /सायकलिंग करणे त्याचप्रमाणे स्वत:च्या शारीरिक क्षमतेनुसार वेगाने धावणे / सायकलिंग करणे/ चालणे याची मुभा असणार आहे.

स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग ॲप किंवा जीपीएस घडयाळाचा वापर करुन धावलेल्या / चाललेल्या /सायकलिंग केलेल्या अंतराची नाेंद घेता येणार आहे किंवा ॲप वापरणे शक्य नसल्यास क्रिया पूर्ण झाल्यानंतरचा फोटो यापैकी एक अपलोड करावे. सर्वांनी धावणे/ चालणे/सायकलिंग ही क्रिया पूर्ण केल्यानंतर http://raigadsports.blogspot.com/ या ब्लॉगवर दिलेल्या लिंकवरुन फॉर्म भरावा. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकास केंद्र शासनाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र

http://raigadsports.blogspot.com/ या लिंकवरून दि.31ऑगस्ट 2020 रोजी पासून डाऊनलोड करुन घेता येईल, अशी माहिती क्रीडा विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सचिन निकम, क्रीडा अधिकारी यांच्याशी मो.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा. तसेच ज्यांना दि.29 ऑगस्ट या दिवशी या उपक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही, अशा सर्वांना दि.29 ऑगस्ट ते 02 ऑक्टोबर या कालावधीत आपल्या सोयीच्या दिवशी व वेळेनुसार या उपक्रमात सहभागी होता येणार आहे,असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी कळविले आहे.