अलिबाग : रायगड जिल्ह्यातील 79 आरोग्य सेवकांची सेवा नियमित करून त्यांना त्यांचे देय वेतन, अन्य आर्थिक लाभ व पदोन्नती या सर्व गोष्टींचा फायदा मिळवा, अशी मागणी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार दळवी यांनी आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. रायगड जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवक यांची खंडीत झालेली सेवा क्षमापित करून त्यांच्या मूळ नियुक्ती दिनांकापासूनच त्यांची कायम सेवा ग्राह्य धरण्यात येऊन, त्यांचे देय असलेले सर्व आर्थिक लाभ आणि पदोन्नतीही पूर्वलक्षी प्रभावाने मिळावी, अशी विनंती आमदार दळवी यांनी केली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या 79 आरोग्य सेवकांना न्याय मिळण्याची शक्यता आहे.