रायगडात 12 ऑगस्टनंतर यायचेय तर ‘स्वॅब टेस्ट’च एन्ट्री पास; नियम लागू

अलिबाग : 12 ऑगस्टनंतर गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात यायचे असेल, तर स्वॅब टेस्ट करणे अनिवार्य ठरणार आहे. कारण स्वॅब टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दिल्यानंतर ई-पास मिळणार आहे. याशिवाय क्वारंटाइनचा कालावधी 10 दिवस केला आहे, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील शांतता समितीच्या सभेनंतर त्या बोलत होत्या.

पालकमंत्री म्हणाल्या, गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात मुंबई-पुण्यातून मोठ्या प्रमाणात नागरीक मूळ गावी परत येतात. कोरानाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना म्हणून सरकार आणि प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात चाकरमान्यांना यायचे असेल, तर त्यांनी 12 ऑगस्टपूर्वी येणे बंधनकारक आहे. त्यानंतर, येणार्‍यांकडे कोरोना स्वॅब टेस्टचा रिपोर्ट असल्याशिवाय त्यांना ई-पास मिळणार नाही. रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल, तर त्यांना ई-पास मिळणारच नाही. क्वारंटाइनची मर्यादा आधी 14 दिवसांची होती. मात्र, रायगड जिल्ह्यासाठी आता 10 दिवसांची करण्यात आली आहे, असे पालकमंत्री म्हणाल्या.

काय म्हणाल्या पालकमंत्री…

* गणेश आगमनाच्या वेळी आणि गणेश विसर्जनाच्या वेळी कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही.

* लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

* गणेशभक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करू नये.
कोरोनाच्या चाचणीसाठी अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात मंजूर झालेली प्रयोग शाळा 20 ऑगस्टपर्यंत सुरू करणार.

* कोकणात येण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यांचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे.

* रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव आणि वीर स्थानकावर या रेल्वे गाड्यांचा थांबा. त्यामुळे खराब रस्त्यावरून प्रवास टळणार.

* मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याची संबंधित ठकेदारांना सूचना.