रायगड जिल्हा पत्रकार संघ, रायगड प्रेस क्लबतर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

bharat3

अलिबाग : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रतिमेला उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.

आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्य सरकारने थोर पुरूषांच्या यादीत समावेश केला आहे. 20 फेब्रुवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकरांची 209 वी जयंती प्रथमच राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जात आहे. बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मतारीख कोणती याबद्दल विविध मतप्रवाह होते. 11 फेब्रुवारी रोजी शासनाने शुध्दीपत्रक काढून 20 फेब्रुवारी रोजी शासकीय, निमशासकीय कार्यालयात बाळशास्त्रींची जयंती साजरी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच राज्यात शासकीयस्तरावर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी होत आहे.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण मेकडे यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी बळवंत वालेकर, नागेश कुळकर्णी यांनी स्व मेकडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. रायगड प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भारत रांजणकर यांचा यावेळी रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने नागेश कुळकर्णी, बळवंत वालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अलिबागचे नगरसेवक उमेश पवार, महेंद्र दुसार, माजी नगरसेवक आर के घरत, अलिबाग प्रेस असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रमोद जाधव, सरचिटणीस समीर मालोदे, उल्हास पवार, हेमकांत सोनार उपस्थित होते.