पोलादपूर : रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य तसेच जिल्ह्यातील पत्रकारितेतील भिष्माचार्य म्हणून सर्वज्ञात तळे येथील ज्येष्ठ पत्रकार नारायणराव अनंत मेकडे यांचे त्यांच्या मुलाच्या घरी डोंबिवली येथे वृध्दापकाळाने 94 व्या वर्षी निधन झाले. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेवर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र शासनाचा दलितमित्र पुरस्कार युतीसरकारचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याहस्ते प्राप्त झालेल्या नारायणराव मेकडे यांना तहहयात गांधीवादी विचारसरणीचे काँग्रेसी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले गेले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाची स्थापना करतेवेळी स्व.प्रभाकर पाटील, मिनाक्षीताई पाटील यांच्यासोबत हिरिरीने नारायणरावांनी पत्रकारांची एकजूट घडवून आणली. यामुळे काँग्रेसी विचारसरणीचे असूनही नारायणराव मेकडे यांनी केलेले सहकार्य अलिबाग पेझारीतील पाटील कुटूंबियांनी नेहमीच स्मरणात ठेवले.
अनेक वर्षे नारायणराव मेकडे यांनी पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषविले. रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या वर्धापनदिन सोहळयासह मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांवेळी नारायणराव मेकडे यांची आवर्जून उपस्थिती आणि उपस्थितांना मार्गदर्शन यामुळे अनेकांना त्यांचे पत्रकारितेतील पितृतुल्य स्थान आदरणीय राहिले. नारायणराव मेकडे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दीर्घ पत्रकारितेसाठीचा पत्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागोठणे प्रेस क्लबच्या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री सुनील तटकरे यांच्याहस्ते नारायणराव मेकडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाड तळा या वस्तीच्या एस.टी. गाडीसाठी तसेच तळा तालुक्याच्या निर्मितीसाठी नारायणराव मेकडे यांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली.
नारायणराव मेकडे यांनी तळे येथून मुलाच्या घरी डोंबिवली येथे वृध्दापकाळामुळे मुक्काम हलविला असता तेथे त्यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली आणि शुक्रवारी रात्री नारायणराव मेकडे यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी डोंबिवली येथे नारायणरावांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि पुढील विधी डोंबिवली येथेच होणार असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी नातवंडे जावई, सुना असा मोठा परिवार आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील, कार्याध्यक्ष नागेश कुलकर्णी आणि महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांनी कुटूंबियांचे सांत्वन करून शोक व्यक्त केला.