रायगड जिल्ह्यात निसर्ग वादळातील ४०टक्के नुकसानग्रस्त कुटुंब मदतीच्या प्रतिक्षेत!

पेण :  रायगडामध्ये ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात अनेकांची घरे उध्वस्त होऊन मोठे नुकसान झाले होते. महसुल विभागाकडून रितसर पंचनामे झाले होते. दोन महिने उलटून गेले तरी नुकासानग्रस्त मदतीपासून वंचीत आहेत. प्रशासकीय उदासिनतेचा फटका विशेषतः ग्रामीण भागातील नुकसानग्रस्तांना झाल्याचे पाहावयास मिळते आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री, विरोधी पक्षनेत्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली होती. नुकसान झालेल्या प्रत्येकाला मदत दिली जाईल असे सरकारने जाहीर केले होते. रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ६० टक्के नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली आहे. जवळपास ४०टक्के नुकसानग्रस्त कुटुंबीय अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. महसुल अधिकारी विशेषतः तलाठी वर्गाकडून मदत मिळेल पण अजूनही काही काळावधी जाईल असे थातुरमातूर कारण सांगून दिशाभूल केली जात आहे.

विश्व हिंदू परिषद व विविध सामाजिक संस्थांनी ग्रामीण भागातील काही लोकांना पत्रे, कौले, अन्नधान्य पुरवून संसाराला हातभार लावला आहे. शासनाकडून मदत मिळाल्यावर घर दुरुस्तीचे काम थांबविले असते तर काहींना अडगळीत संसार थाटावा लागला असता नाहीतर पावसात भिजत राहावे लागले असते.

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन आसल्याने लोकांना कामधंदा नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील रेवस विभातील गावे, रोहा तालुक्यातील कोलाड, खांब, देवकान्हे, सुतारवाडी आणि पेण तालुक्यातील विशेष समुद्र किनारपट्टी परिसरातील भाल, कान्होबा, काळेश्री, सोनखार, दादर, कळवे आदी गावातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले. वादळाने अनेकांची घरे,पत्रे, भीतींची पडझड झाली तर काही घरेच जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, पेणचे आमदार रविशेठ पाटील, खासदार सुनिल तटकरे,पालक मंत्री आदिती ताई तटकरे यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली होती. त्यांच्या आदेशाने पंचनामे सुध्दा झाले आणि मदतही मिळाली ती ठराविक लोकांनाच कशी मिळाली याबाबतीत तर्कवितर्क केले जात आहेत.
दरम्यान जिल्हा प्रशासनाकडे नुकसान भरपाईची रक्कम वाटपासाठी कमी निधी पडत असल्याचे कारण पुढे करण्यात येत होते. शासनाकडून पुन्हा अवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आलेली असताना नुकसानभरपाई वाटपाची कार्यवाही होत नसल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.