पेण (राजेश प्रधान) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारंवार अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे पेणमध्ये बौद्ध समाज व विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री चंदक्रांत पाटील यांचा निषेध व्यक्त करीत निषेध रॅली काढून आपला संताप व्यक्त केला.
यावेळी मोर्चात माजी नगरसेविका प्रतिभा जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, शिवसेना महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावंड, पीआरपीचे सीताराम कांबळे, बहुजन विद्यार्थी संघटनेचे समीर घायतळे, माजी नगराध्यक्ष संतोष श्रृंगारपुरे, माजी नगरसेवक कृष्णा भोईर, भारत मुक्ती मोर्चाचे विजय आवास्कर, रियासत पठाण, अँड प्रमोद कांबळे, अँड. वैशाली कांबळे, बामसेफचे अहद अधिकारी, भाऊ मुजावर, भारतीय बौद्ध महासभेचे आनंद जाधव, काँग्रेसचे राजेंद्र म्हात्रे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा सुचिता चव्हाण, संदीप सुर्वे, प्रशांत कांबळे, रामलाल जैसवार, सचिन गायकवाड, सुरेश घायतळे, मेघना चव्हाण, नरेश भालेराव आदींसह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा जाधव यांनी सांगितले कि, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल जे वक्तव्य केले हे निषेधार्ह आहे. इतिहासाचा बीजेपी वाल्यांनी प्रथम अभ्यास करावा. ज्या राज्यघटनेमुळे तुम्ही निवडून आलात पदे भूषवतंय, त्यांचा अपमान करताना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, अँड. प्रमोद जाधव, विजय आवास्कर, राजेंद्र म्हात्रे यांनी आपल्या भाषणांतून सध्याचे सरकारमधील मंत्री राष्ट्रपुरुषांचा वारंवार अपमान करीत आहेत. बिजेपीचा अजेंडा या सरकारमधील मंत्र्यांनी तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राबविला आहे. याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे.
देशात आणि राज्यात एक वेगळे वातावरण निर्माण करून लोकांचे मूलभूत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी दुसरीकडे लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. यामुळे सत्तेमधील मंत्र्यांकडून जाणूनबुजून राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचे कटकारस्थान निर्माण केले जात आहे असा आरोप यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणातून केला.
असे प्रकार थांबले नाहीत तर शिवशक्ती, भीमशक्ती व इतर सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्यावशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी पेण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.