रिया चक्रवर्तीचा जामीन अर्जही फेटाळला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज  फेटाळळून रियाला १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अंमली पदार्थांच्या आरोपावरून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी पूर्ण झाली असून, तिला एनसीबीच्या कोठडीत घेण्याची आवश्यकता नसल्याने तशी मागणी करण्यात आली नाही, अशी माहिती अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येमागील ‘ड्रग्ज कनेक्शन’ सक्तवसुली संचालनालयाच्या तपासात उघड झाल्यानंतर अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकाने याबाबत तपास करण्यास सुरुवात केली. रिया हिची सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर आज तिला अटक करण्यात आली. तिचा भाऊ शौविक, सुशांतच्या सहाय्यक आणि काही ड्रग्ज विक्रेत्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

रियाने ‘ड्रग्ज कनेक्शन’ संदर्भात आवश्यक ती माहिती चौकशीदरम्यान दिली आहे. तिच्यामार्फत ज्या संशयितांपर्यंत पोहोचायचे होते ते संशयित गजाआड आहेत. असे असताना रियाची कोठडी घेण्याची आवश्यकता नसल्याचे एनसीबीच्या वतीने सांगण्यात आले.