मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्स कनेक्शनच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामीन विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच तिला आता भायखळा जेलमध्येच ठेवले जाणार आहे. तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती व इतर 8 आरोपींचा जामीन देखील न्यायालयाकडून नामंजूर करण्यात आला आहे.
. मंगळवारी तिला अटक केल्यानंतर मजिस्ट्रेट कोर्टाने 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता रियाचे वकील जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत. रियाने आपल्या जामीन अर्जात कबुलीजबाब मागे घेत, एनसीबीकडून चौकशी दरम्यान गुन्हा स्विकारण्यासारखे कबुलीजबाब देण्यास भाग पाडण्यात आल्याचे म्हटले आहे. रियाने दावा केला की, तिने कोणताही गुन्हा केला नसून, या प्रकरणात अडकवले जात आहे.
मात्र दुसरीकडे एनसीबीने युक्तीवाद केला की, जर अभिनेत्रीला जामिनावर सोडण्यात आल्यास ती पुराव्यांशी छेडछाड करू शकते व समाजातील आपले स्थान आणि पैशांद्वारे साक्षीदारांना आपल्या बाजूने वळवू शकते. एजेंसीने म्हटले की, रियाला तिचा बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत ड्रग्स घेत असल्याची माहिती होती व ड्रग्स खरेदी करून देत असल्याने ती गुन्ह्याचा भाग आहे.