पेण (राजेश प्रधान) : पेणकरांची हक्काची सकाळी ७:३० ची पेण दिवा ही मेमू रेल्वे रोह्याला पळविल्यानंतर पेणच्या रेल्वे प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त रेल्वे प्रवाशांनी “माझं पेण” व “प्रवासी सन्मान समिती” च्या माध्यमातून रेल रोको करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला.
रेल्वे रोको इशाऱ्याने रेल्वे प्रशासन वठणीवर आले असुन “माझं पेण” संघटनेला बैठकीचे निमंत्रण देऊन चर्चेतून प्रश्न सोडविण्याचा रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे रविवारी 11 डिसेंबरला होणारा रेल्वे रोको आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आला आहे.
पेण तालुक्यातून दररोज हजारो रेल्वे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. कोरोना महामारी पूर्वी पेणला थांबणारी दिवा – सावंतवाडी या गाडीचा पेण चा थांबा रेल्वे प्रशासनाने बंद केला, त्याचप्रमाणे कोरोनाचे कारण देत पेण ते पनवेल रेल्वे तिकीट १० रुपयांवरून ३० रुपयांवर नेले, हेही कमी नव्हते तर पेणकरांची हक्काची ७:३० वाजताची पेण-दिवा मेमु रेल्वे रोह्यापर्यंत वाढवली त्यामुळे पेणकरांच्या नशिबी पुन्हा चेंगराचेंगरीत उभ्याने प्रवास करण्याची पाळी आली.
रेल्वे प्रशासनाकडून कायमच पेणच्या रेल्वे प्रवाशांना सावत्र वागणूक देण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून पेण तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांनी निवेदने रेल्वे प्रशासनाला दिली. तसेच अनेक वेळा आंदोलनेही केली. परंतु रेल्वे प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नव्हती. रेल्वे रोको आंदोलनाची दखल मात्र रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. या कामी पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी मोलाची भूमिका पार पडली.
या आहेत मागण्या—-
पेण- दिवा- पेण मेमू रेल्वे पूर्वीप्रमाणे सुरू करून तिच्या फेऱ्या वाढवाव्यात,
कमीत कमी 10 एक्सप्रेस गाड्या पेणला थांबाव्यात,
व्यापारी व नागरिकांकरिता सकाळी 9:00 वाजता पेण-पनवेल मेमु गाडी सुरू करावी,
दिवा सावंतवाडी-दिवा या रेल्वेला पुर्वी प्रमाणे पेण येथे थांबा मिळावा,
पेण पनवेल प्रवासाकरिता 30 रुपये आकारात येणारे तिकीट पुन्हा 10 रुपये आकारण्यात यावे.
मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन—-
रेल्वे प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन माझं पेण व प्रवासी सन्मान समितीला चर्चेला बोलविले आहे. सोमवार दिनांक 12 रोजी दुपारी 3 वाजता रेल्वे प्रशासनाकडून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुख्यालयात या संदर्भात चर्चे करता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पेणकरांच्या न्याय मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा प्रखर आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा “माझं पेण” समितीने दिला.
यावेळी माझं पेण” समितीचे मुख्य पदाधिकारी तसेच प्रदीप वर्तक, रितेश शहा, देवेंद्र म्हात्रे, सनम म्हात्रे, नंदकिशोर म्हात्रे, दिलीप पाटील, सी.आर.म्हात्रे, निरज मिस्त्री, नागेश अनगत, मंगेश नाईक, प्रमोद जोशी, हर्षद भगत हे उपस्थीत होते.