रोहा : कालव्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुर ! पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांचे पुन्हा स्पष्ट सूतोवाच

kalava-andolak
कोलाड (श्याम लोखंडे) : कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याला यावर्षीपासून नियोजित पाणी सोडण्यात येईल, कालव्याला पाणी सोडण्याचे स्पष्ट सुतोवाच संबधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा मंगळवारी कालवा समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
आंबेवाडी, संभे, अशोकनगरच्या कालव्याची दुरुस्ती कामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तर कालवा दुरुस्तीतील लिकेज सायपनचे तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करा, त्यामुळे कामांतील गोंधळ थांबेल, कामे नेमकेपणाची दर्जेदार होतील, आम्हा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची गरज तेथे मदत घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण कालव्याला पाणी घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, विभागीय ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची वेळ आणू नका असा समजवजा ईशारा समन्वय समितीने यावेळी संबधीत अधिकाऱ्यांना दिला.
पाणी देणे हे आमचे प्रथम कर्तव्य – एस एस महामुनी
त्यावर तुम्हा विभागातील ग्रामस्थांची भावना आम्ही समजू शकतो, तुम्हाला पाणी देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, त्यादृष्टीने कालव्याच्या कामांचा उरक आम्ही करत आहोत, यावर्षीपासून कालव्याला पाणी देणार, असे स्पष्ट सुतोवाच उपविभाग अभियंता एस एस महामुनी यांनी दिला आणि विभागीय ग्रामस्थांच्या पाण्याविषयीच्या अपेक्षा अधिक प्रफुल्लीत झाल्या.
आठ वर्षे भातशेती ओसाड
दरम्यान, कालवा दुरुस्तीच्या नावाखाली पाटबंधारेने तब्बल आठदहा वर्षे पाणी रोखले. त्यामुळे हजारो हेक्टर भातशेती क्षेत्र ओसाड पडले, जमिनी नापीक झाल्या, याला पाटबंधारे विभागच जबाबदार आहे, अशात शेतीची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची भरपाई मिळावी, अन्यथा शेतकरी प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन उभे करतील, शेतीची भरपाई द्या असे निवेदन कालवा समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने पाटबंधारेंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले, तर कालव्याच्या पाण्याबाबत रद्द झालेली तहसील कार्यालयातील महत्वाची बैठक पुढील आठवड्यात तातडीने घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया तहसिलदार कविता जाधव यांनी दिली.
कोलाड पाटबंधारेनी आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याला दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल आठदहा वर्षे पाणी सोडले नाही. निकृष्ट दर्जाचे कॉंक्रिटीकरण, नको तिथे मोऱ्या बांधून करोडो रुपये निधीचा अपहार झाला, अशातच आठदहा वर्षाचा कालवा दुरुस्तीचा निधी गेला कुठे ? याच आरोपांत कालव्याला पाणी सोडा या ग्रामस्थांच्या वारंवार मागणीकडे पाटबंधारे विभागाने दरवर्षी दुर्लक्ष केले. अखेर ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला. कालव्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी सप्टेंबर महिन्यात एल्गार केला. आंदोलनपाठोपाठ उपोषणाचे हत्यार उपसताच प्रशासन भानावर आले.
 नियोजित बैठक तहसिलदार यांनी केली रद्द
कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन समन्वय समिती ग्रामस्थांना दिले. मात्र कालव्याच्या दुरुस्ती कामांना डिसेंबर अखेर प्रारंभ नाही. महत्त्वाचे सायपन दुरुस्ती करणार कधी ? असा संताप व्यक्त करत समन्वय समितीने रोहा तहसीलदार यांच्याकडे बैठकीची मागणी केली. त्यानुसार पाण्याबाबत नेहमीच जाणीवेच्या ठरलेल्या तहसिलदार कविता जाधव यांनी मंगळवारी कालव्याच्या पाणी बैठकीचे आयोजन केले. मात्र अलिबाग येथील महत्त्वाच्या बैठकीला जाण्यासाठी तहसिलदार यांनी नियोजित बैठक रद्द केली, आता पाण्यासाठीची बैठक पुढील आठवड्यात घेऊ असे ठोस आश्वासन जाधव यांनी दिले.
याचवेळी समन्वय समितीने नायब तहसीलदार राजेश थोरे यांना कालव्याला दहाबारा वर्षे पाणी नसल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले, शेतीच्या नुकसान भरपाई मागणीचे निवेदन दिले. तदनंतर शेती नुकसान भरपाईचे निवेदन कोलाड पाटबंधारेचे उपकार्यकारी अभियंता के एस आगावणे, उपविभाग अभियंता एस एस महामुनी यांना दिले.
यावेळी समन्वय समितीचे विठ्ठल मोरे, तुकाराम भगत, माजी सभापती विष्णू मोरे, मारुती फाटक, प्रशांत राऊत, राजेंद्र जाधव, नंदकुमार बामगुडे, परशुराम कांबळे, किशोर कळंबे उपस्थित होते.
समन्वय समितीच्या प्रमुखांनी संबधीत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. लिकेज सायपनचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करा, तरच पाणी सोडण्याला यश येईल, पाणी आम्ही यावर्षी घेणारच, त्यात हयगय केली तर ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा सज्जड ईशारा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. त्यावर कालव्याच्या पाण्याबाबत ग्रामस्थांच्या भावनेची आम्हाला जाणीव आहे, यावर्षी कालव्याला पाणी सोडणे हेच आमचे ध्येय आहे, अशी जाणीवेची भावना अधिकारी एस एस महामुनी यांनी व्यक्त केली. त्यावर समन्वय समितीच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
कामं युद्धपातळीवर सुरू
दरम्यान, कालवा दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे समोर आले. त्यात कालव्याला पाणी सोडण्याचे स्पष्ट सूतोवास संबधीत अधिकाऱ्यांनी दिल्याने पाण्याच्या स्वागताला संबंध विभाग वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेनंतर सज्ज झाला आहे, तर पुढील आठवड्यात रोहा तहसील कार्यालयात होणाऱ्या पाटबंधारे अधिकारी व समितीच्या महत्त्वाच्या बैठकीकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *