रोहा : कालव्याच्या पाण्याबाबत तहसील कार्यालयात महत्त्वाची बैठक, साफसफाईला मिळाला मुहूर्त

kalava
रोहा : कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी पर्यंतच्या कालव्याला तब्बल आठदहा वर्षे पाणी सोडण्यात आलेले नाही. पाटबंधारेने अख्खा परिसर दुष्काळात लोटला. पाण्यासाठी वरिष्ठ राजकारण्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. याच भयान वास्तवात विभागीय कालव्याला या वर्षापासून पाणी सोडण्यात यावे असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थ समावेश कालवा समन्वय समितीने घेतला. मोर्चा आंदोलन ईशारा पाठोपाठ आमरण उपोषणाचे हत्यार उपसताच पाटबंधारे प्रशासन कधी नव्हे ते भानावर आले. त्यातच ग्रामस्थांच्या न्याय्य आंदोलनाची दखल घेत तहसीलदार कविता जाधव यांनी दालनात पाटबंधारेचे अधिकारी व समन्वय समितीची बैठक घेतली. त्या बैठकीत डिसेंबर अखेर कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाने दिले. मात्र अजूनतरी कालव्याच्या साफसफाई मुख्यतः सायपन दुरुस्ती कामाला जलदगतीने प्रारंभ नाही. अनेक ठिकाणचे महत्वाचे लिकेज सायपन दुरुस्ती होणार कधी, कालव्याला पाणी सोडणार कधी याच प्रतिक्षेत अखेर कालव्याच्या साफसफाईला मुहूर्त मिळाल्याची बाब शनिवारी समोर आली.
पण सायपन कामे होणार कधी ? अशी स्पष्ट नाराजी तहसील प्रशासनाकडे व्यक्त झाल्याने ग्रामस्थांच्या नाराजीवजा आक्रमकतेची दखल घेत आज सोमवारी दुपारी रोहा तहसील कार्यालयात कालव्याच्या पाण्यासंदर्भात महत्त्वाची आढावा बैठक होत आहे. महत्त्वाच्या बैठकीत पाटबंधारेची अधिकारी कालव्याला पाणी सोडण्यासंदर्भात, दुरुस्ती कामांसंदर्भात नेमकी काय माहिती देतात, त्यावर समन्वय समिती नेमकी काय भूमिका व्यक्त करते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कालव्याच्या पाण्यासंदर्भात बैठकीला समितीच्या सर्व प्रमुखांनी उपस्थित राहावे असे आवाहन तुकाराम भगत यांनी केले, तर मागील आठदहा वर्षे कालव्याला पाणी सोडले नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, असे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात येणार आहे अशी अधिक माहिती समितीचे विठ्ठल मोरे यांनी पत्रकारांना दिली आहे.
आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या विभागीय कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ समन्वय समितीने सप्टेंबर महिन्यात केली. पाण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. दुसरीकडे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांनीही भाजपच्या वतीने उजवा व डावा तीर कालव्याच्या पाण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली. वरिष्ठ प्रशासन आणि संबंधीत लोकप्रतिनिधीना पत्रव्यवहार केला. पाठोपाठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी पाण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. अखेर चोहोबाजूच्या आक्रमकतेची दखल घेत तहसीलदार कविता जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत दालनात ग्रामस्थांची बैठक घेतली, ग्रामस्थांची आक्रमक न्याय्य भूमिका विचारात घेत पाटबंधारेने ग्रामस्थांना पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन दिले.
बैठकीला पाटबंधारेच्या मुख्य कार्य. अधिकारी दीपश्री राजभोज यांसह अधिकारी, समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. अशात डिसेंबर संपला तरी कालव्याची साफसफाई, सायपन दुरुस्ती नाही हे समोर येताच ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले. समन्वय समितीने मुख्य कार्य अधिकारी राजभोज यांची भेट घेतली. मात्र राजभोज यांच्या दिशाभूल स्पष्टीकरणाने ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणाचे तरी दडपण आहे असा सवाल उपस्थित झाला.
याच सर्व घडामोडीत विधान परिषदेचे अलिबाग येथील आ जयंत पाटील यांनी नागपूर अधिवेशनात कालव्याच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारेमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी न सोडण्याची कबुली दिली. आ पाटील यांच्या पाणी जाणिवेच्या भूमिकेने समन्वय समितीच्या लढ्याला अधिक बळ आले. याच पार्श्वभूमीवर आज पाण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक होत आहे. तहसीलदार रोहा यांनी घेतलेल्या पाणी सोडण्याच्या दुसऱ्या आढावा बैठकीत पाटबंधारेचे अधिकारी नेमके काय आढावा देतात, त्यावर समन्वय समितीच्या ग्रामस्थांचे समाधान होते का, विभागीय ग्रामस्थ कालव्याच्या पाण्याबाबत, सायपन दुरुस्ती आग्रहाबाबत नेमकी काय भूमिका व्यक्त करतात ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कालव्याच्या साफसफाईला प्रारंभ केले आहे अशी माहिती अभियंता गोरेगावकर यांनी दिली, सायपन दुरुस्तीचे काय ? यावर उत्तर नसल्याने पाटबंधारेचे चाललंय काय ? अशी स्पष्ट नाराजी व्यक्त झाली. याच दृष्टीने कालव्याच्या पाण्याचे भवितव्य, ग्रामस्थांचे आंदोलन आजच्या महत्त्वाच्या बैठकीतून अधोरेखीत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *