कोलाड (श्याम लोखंडे ) : अविष्कार फाऊंडेशन इंडिया (कोल्हापूर -महाराष्ट्र राज्य) ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत आहे. या संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चे औचित्त साधून देशातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा सन्मान केला जातो. या अनुषंगाने पुरस्कारासाठी रोहा चे शिक्षक विलास रामचंद्र सुटे (पदवीधर शिक्षक ) राजीप शाळा तळाघर व त्यांची सपत्नी सौ विनया विलास सुटे सहशिक्षिका को एस सो यांची २०२१करीता अविष्कार फाऊंडेशन कडून राज्यस्तरीय क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार व त्यांच्या सौभाग्यवती शिक्षिका राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२१ करिता पुरस्कार गणपतीपुळे रत्नागिरी या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथीच्या शुभहस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सदरच्या पुरस्काराचे वितरण (दि.१० जाने) रोजी हॉटेल दर्यासारंग पॅलेस गणपतीपुळे जि. रत्नागिरी याठिकाणी आविष्कार फाऊंडेशनचे चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, साहित्यिक तथा कवी प्राध्यापक किसनराव कुराडे, रत्नागिरी डाएटचे अधिव्याख्याते रमेश कोरे, बालकवी शाम कुराळे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन रोह्याच्या सुटे दाम्पत्याच्या गुणवंत शिक्षक शिक्षिका पुरस्काराने यथोचित सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात रोहा येथील पदवीधर शिक्षक विलास रामचंद्र सुटे हे राजीप शाळा तळाघर, तालुका रोहा येथे तर त्यांच्या सौभाग्यवती शिक्षिका सौ. विनया विलास सुटे या को ए सोसायटीच्या माध्यमिक शाळेत सह शिक्षिका म्हणून सेवेत आहेत. आजचे विध्यार्थी हे उद्याच्या देशाचे भावी नागरिक आहेत असे मानून विद्यार्थ्यांना चांगले संस्कारक्षम शिक्षण देऊन घडविण्याचा प्रयत्न हे सुटे दाम्पत्य करीत असून सुटे दाम्पत्याच्या कार्याची दखल उपरोक्त राष्ट्रीकृत संस्थांनी घेऊन त्यांना गुणवंत शिक्षक व शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आविष्कार फाऊंडेशन इंडिया चे कोकण विभाग अध्यक्ष आबासाहेब पवार, रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, केंद्र प्रमुख संघटना रायगड जिल्ह्याध्यक्ष संदीप जामकर, जावळी हायस्कूलचे पदवीधर शिक्षक मंगेश बुटे आदी उपस्थित होते.