रोहा : संपूर्ण रायगड जिल्हा अल्पवयीन मुलीवरील ज्या बलात्कार आणि खून प्रकरणाने हादरला, त्या प्रकरणाची केस न्यायालयात प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम लढणार आहेत. 26 जुलै 2020 रोजी रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रोहा तालुक्यातील तांबडी येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी न्याय देण्यासाठी आणि आरोपींना जरब बसण्यासाठी फाशीची शिक्षा सुनावली जावी, यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर नराधमांना फाशी देण्यात यावी, असेही ते यावेळी म्हणाले. रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते.
खासदार तटकरे म्हणाले, या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. ही मागणी करताच उज्ज्वल निकम यांनीही होकार दिला आहे. तपास योग्य दिशेने होत असल्याने आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रसंगी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, रोहा तालुका अध्यक्ष विनोद पशिलकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या केल्याची घटना घडल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी 28 जुलै 2020 रोजी पिडीत कुटुंबियांची भेट घेतली होती.
दरेकर यांनी त्यावेही म्हटले होते की, रोहा येथील घटना लाजीरवानी आणि चिड आणणारी आहे. गुन्हेगारांविरोधात जलदगती खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी.
यावेळी दरेकर सकाळी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ते म्हणाले, राज्य सरकारचा पोलिस प्रशासनावर वचक राहीलेला नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पिडीत कुटूंबाच्या बाजूने न्याय मिळावा यासाठी खटला चालवताना नामांकीत वकील दिला जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले होते.
26 जुलै 2020 रोजी रोहा तालुक्यातील तांबडी येथे ही घटना घडली होती. सोमवारी ताम्हणी शेत गावच्या जवळ वावल्याचा कोंडाच्या मध्यभागी मोठ्या दगडावर अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर संतापाची लाट उसळली होती.