रोहा : चक्रीवादळाला तीन महिने होत आले तरी रोहा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील बहुतांशी नुकसानग्रस्त आपल्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. आपली मदत कधी मिळेल याची चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालयात फेऱ्या मारून नुकसानग्रस्त मेटाकुटीला आला आहे. हताश झालेल्या यासर्व नागरिकांच्या भावनांची दखल घेत दहा दिवसांत तालुक्यातील सर्व नुकसान ग्रस्तांच्या खात्यामध्ये मदत निधी जमा करण्यात यावा असे निवेदन रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंतरा माने यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहाच्या वतीने देण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात नागरिकांच्या घरांचे, शेती व बाग बगिचांचे अपरिमित नुकसान झाले.शेकडो बेघर झाले ,उत्पन्न देणारी झाडे कायमची उध्वस्त झाली.आधीच कोरोना मुळे मेटाकुटीला आलेला सर्वसामान्य नागरिक या नैसर्गिक आपत्ती मुळे पुरता हवालदिल झाला होता.वादळानंतर राज्य शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करत नुकसानग्रस्तांना प्रत्यक्ष मदत वितरणास सुरुवात झाली. मात्र असे असताना रोहा तालुक्यातील अनेक नागरिक या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील कोणताही प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी गेल्यानंतर त्यावर प्रशासन तातडीने निर्णय घेत न्याय मिळतो, हा विश्वास नागरिकांच्या मनात आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अश्या भावना रोहा मधील नागरिकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांन कडे व्यक केल्या. नागरिकांच्या या भावनांची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. पुढील दहा दिवसांत या निवेदनाची दखल घेत नुकसान ग्रस्ताना मदत न मिळाल्यास या सर्व मदती पासून वंचीत नागरिकांच्या सोबत आपल्या कार्यालया समोर जन आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
उपजिल्हाध्यक्ष अमोल पेणकर यांचा नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात दिलेल्या मुदतीत जर नुकसान ग्रस्तांच्या खात्यात मदत जमा न झाल्यास नुकसानग्रस्त नागरिकांच्या साथीने मनसे स्टाईल जन आंदोलन करण्याचा अल्टिमेट प्रशासनाला दिला आहे. काल निवेदन देते वेळी प्रल्हाद पारंगे – रोहा तालुका चिटणीस,हरिश्चंद्र तेलंगे – रोहा तालुका उपाध्यक्ष, साईनाथ धुळे – मनविसे, मंगेश रावकर – रोहा शहर अध्यक्ष, अमित पवार – रोहा शहर उपाध्यक्ष,महेश साळुंखे – रोहा शहर उपाध्यक्ष, दिपश्री घासे – महिला सेना, प्रीती पारंगे – महिला सेना, गोरखनाथ पारंगे – नागोठणे विभाग अध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते.