नागोठणे (महेश पवार) : सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे रोहा तालुक्यात आजपर्यंत अनेक सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा व शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. याचप्रमाणेच जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व विधान परिषदेचे तरुण तडफदार आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्याच संकल्पनेतुन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन “लहराओ तिरंगा प्यारा” या महाध्वज संचलन कार्यक्रमाचे आयोजन २६ जानेवारीस प्रजासत्ताक दिनी करण्यात आले आहे.
रोहा शहरातील दमखाडी येथील रोहा शहराचे नामफलक ते फिरोज टाॅकिज या तब्बल १ किलोमीटर पर्यंतच्या अंतरामध्ये भारत देशाचा कापडी तिरंगा ध्वज फडवण्याचा संकल्प सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे. जागतिक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व योग्य ती खबरदारी घेऊन या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी तीन हजार नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे व ना. आदिती तटकरे यांनी केले आहे.