ठाणे : ठाणे जिल्हयात मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्यात 20 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान पल्स पोलिओ लसीकरण दिवस जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडुन राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हिरालाल सोनवणे यांनी दिली आहे.
ग्रामिण भागात एकुण १ लाख बहात्तर हजार आठशे सत्तर बालकांना लस पाजण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ मनिष रेंघे यांनी दिली. जिल्हयातील चारही तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचे या संदर्भात प्रशिक्षण पुर्ण झाले असुन एकुण १०८० लसीकरण बुथ स्थापन करण्यात आले आहेत. एकुण ४०५ मोबाईल टिम्स रेल्वे स्टेशन, बस स्थानक इ.ठिकाणी कार्यरत असणार आहेत.
युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या सहकार्याने, सदर मोहिम राबविण्यात येत असुन, पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस पाजुन पोलिओ मुक्त जग करण्यासाठी सर्व पालकांनी सहकार्य करण्याकरिता जिल्हा परिषद अध्यक्षा, श्रीम प्रतिक्षा लोणे व जिल्हा परिषद आरोग्य सभापती, श्री कुंदन पाटील यांनी आवाहन केले आहे.
कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करुन या वेळेच्या पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान कोविड १९ साथीच्या कालावधीत विशेष काळजी घेण्याबाबत सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच मोहिमेदरम्यान सर्व कर्मचारी यांना मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर वापरण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत व पुरवठा करण्यात आला असून सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करणे बाबत सूचना दिल्या आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे डॉ.मनिष रेंघे दिली आहे.