मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोराना आणि लॉकडाऊनविषयी अतिशय महत्वाचे आदेश दिले आहेत. यामध्ये ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोरोनाला रोखण्यासाठी केवळ लॉकडाऊन करणे महत्त्वाचे नाही तर कोरोना रुग्णांचा शोध घेण्यावर भर द्या.
राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत मंत्रिमंडळा बैठकीत सादरीकरण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, कोरोनाबाबत कुठेही गाफील न राहता संकट आटोक्यात येत नाही तोपर्यंत सावध रहावे अशा सूचना मागील आठवड्यात झालेल्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत. कोरोना रुग्णांचा शोध, त्यांचे सपर्क व त्यांना वेळीच विलगीकरण सुविधेमध्ये दाखल करणे, योग्य ते उपचार तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. सर्व पालिकांनी या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे कार्यवाही करावी.
1 सप्टेंबरनंतर पीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा बंद करण्याचे केंद्रांने सांगितले आहे. मात्र, पुढील काळात देखील सुरु ठेवावा अशी विनंती आपण पंतप्रधानांना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, महाराष्ट्रामधील मृत्युदर आता 3.62 टक्के इतका कमी झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 27 दिवसांवर गेला आहे. मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवस झाला आहे. दर 10 लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे, मुंबई आणि पुणे या भागातील असून कल्याण-डोंबिवली महापालिका, पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई या पालिकांमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.
पोलिसांना वसाहतीमध्ये राहण्याची परवानगी
कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस वसाहतींमध्येच वास्तव्य करण्याची मुभा देण्यात आली आहे. याचा फायदा सेवानिवृत्त पोलीस, बदली झालेले कर्मचारी व वैद्यकीय अपात्र पोलिसांना होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली.