लोहारेतील साने गुरूजी विद्यालयासाठी ‘देणाऱ्यांचे हात हजार’ पुढे यावेत, दर्पण पुरस्कारविजेते पत्रकार शैलेश पालकर यांचे आवाहन

shailesh-palkar
पोलादपूर : शेतकऱ्यांच्या राज्यासाठी कामकऱ्यांच्या राज्यासाठी। लावू पणाला प्राण। असे आवाहन आपल्या स्फूर्तीगीतातून करणाऱ्या परमपूज्य साने गुरूजी यांच्या नावाने सुरू असलेल्या आणि शेतकरी कष्टकरी जनतेची मुलं मुली शिकत असलेल्या साने गुरूजी विद्यालय लोहारेसाठी ‘देणाऱ्यांचे हात हजार’ पुढे यावेत,असे आवाहन पोलादपूर येथील ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार शैलेश पालकर यांनी केले.
6 जानेवारी 2023 रोजी आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकारिता पुरस्कार 2022 स्विकारल्यानंतर दि. 7 जानेवारी रोजी साने गुरूजी विद्यालय, लोहारे येथे पालकर यांचा पोलादपूर तालुक्यातील पहिला जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला असता त्यांनी हे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपिठावर सहयोग प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश चव्हाण, उदघाटक प्रमुख अतिथी माई तथा मंजुळा गांधी, देणगीदार शुभांगी उतेकर, संस्थेचे कार्यवाह दत्तात्रय काठाळे, विश्वस्त सुखदेव मोरे, सुरेंद्र जाधव, सुभाष ढाणे, उपसरपंच लिलाजी शेडगे तसेच प्रशालेच्या पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका संजना शिंदे, प्राथमिक मुख्याध्यापिका साधना चिकणे, माध्यमिक मुख्याध्यापिका सुगंधा वाढवळ आदी मान्यवर उपस्थित होते. या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ माई गांधी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मान्यवरांच्याहस्ते यावेळी दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी माई गांधी, शुभांगी उतेकर तसेच पालकवर्ग यांनी स्नेहसंमेलनासाठी तसेच विविध सादरीकरणासाठी कौतुक म्हणून रोख रक्कमेची बक्षिसे मोठया प्रमाणात दिली. याप्रसंगी काठाळे, माई गांधी, शुभांगी उतेकर तसेच स्नेहसंमेलनाच्या शुभारंभाचे अध्यक्ष रमेश चव्हाण यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाला प्रेक्षक म्हणून पालक तसेच पोलादपूर शहर, दिविल, लोहारे, तुर्भे, पार्ले तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचें सूत्रसंचालन विनय हाटे यांनी केले.
विविध गुणगौरव सोहळयातही तालुक्यातील शाळांचा गौरव
साने गुरूजी विद्यालय लोहारे येथे सहयोग प्रतिष्ठानच्या विविध गुणगौरव सोहळयाचे आयोजन 6 जानेवारी रोजी करण्यात आले असता पोलादपूर तालुक्यातील विविध शाळांना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.  यावेळी सहयोगचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण यांनी समारंभाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी पोलादपूर तालुक्यातील उद्योजक संतोष मेढेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रथम क्रमांकाचा साथी शशिताई लाड स्मृती चषक माध्यमिक विद्यालय सवाद, द्वितीय क्रमांक कांगोरी माध्यमिक विद्यालय मोरसडे, तृतीय क्रमांक माऊली प्रशाला कोतवाल, माध्यमिक शालांत परिक्षेत मराठी माध्यमात प्रथम रसिका शिंदे व इंग्रजी माध्यम यशवंतची वैभवी अजय महाडीक, मराठी विषयात साने गुरूजी विद्यालयाची अनुष्का कदम, हिंदी विषयात सवाद माध्यमिक विद्यालयाची स्वराली फुलसुंदर, इंग्रजी विषयात साने गुरूजी विद्यालय लोहारेची अनुष्का कदम, गणित विषयामध्ये साखर विद्यालयाचा कुणाल चोरगे, विज्ञान विषयामध्ये यशवंतची वैभवी महाडीक, समाजशास्त्र विषयामध्ये कांगोरीगडचा नितेश सुतार आदींना पारितोषिके प्रदान करण्यात आली. चौथी मिडलस्कूल स्कॉलरशिप परिक्षेचे गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि हायस्कूल स्कॉलरशिप परिक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच माध्यमिक शाळांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *