उरण (विठ्ठल ममताबादे ) : वडाचे झाड अर्थात वटवृक्ष हा भारत देशाचा राष्ट्रीय प्रतिक आहे. कित्येक पक्षांच्या प्रजातींचा तो अन्नदाता आहे, १२ तासाहून अधिक काळ ऑक्सिजन देणारा अक्षयवट आहे. वटवृक्षांची नवी मुंबईचा संकल्प हाती घेतलेल्या उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने उलवे शहरातील प्रत्येक सेक्टर मधे विविध ठिकाणी फक्त पाच वटवृक्ष लावण्याकरिता सिडकोकडे जागेची मागणी केली आहे.
ह्या मागणीचा संस्थेचा खास एकच उद्देश असा आहे की, जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी विवाहित स्त्रिया ह्या वडाची पुजा करतात. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य मिळण्याकरिता वडाला धागा बांधून जन्मोजन्मी सोबत राहण्यासाठी सात फेरे घेतात.
आज उलवे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वटवृक्षांची संख्या मात्र फारच कमी असल्याचे दिसुन येते. शिवाय उलवे सेक्टर २४, २५, २५ए मधे तर एकही वटवृक्ष नसल्याने यापुढे तेथील सुहासिनीना वटपौर्णिमेचा व्रत पुर्ण करण्यासाठी खुप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. वडाचे झाड उपलब्ध नसल्याने फांद्या तोडून घरच्याघरी वटपौर्णिमा साजरी करण्याची वेळ येवून ठेपते. अगोरच विमानतळासाठी केलेल्या वृक्षतोडीमुळे उलवे शहरांतील हवा प्रदुषणात वाढ झाली आहे.
त्यामुळे वटवृक्षांच्या रोपांचे जास्तीत जास्त लागवड करुन वटपौर्णिमेच्या सणाची परपंरा अशीच कायम पुढे अवितरपणे चालु राहण्याकरिता उलवे शहरांतील प्रत्येक सेक्टर मधे किमान पाच वटवृक्षांसाठी आवश्यक जागेची मागणी संस्थेचे अध्यक्ष वृक्षप्रेमी किरण मढवी यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि सिडकोचे मुख्य सामाजिक सेवा अधिकारी यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.