कोलाड (श्याम लोखंडे) : पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन ! या उक्तीचे महत्त्व जाणून छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विदया मंदिर वडघर (मुद्रे) ता.माणगाव रायगड तथा कै.शंकर सिताराम देशमुख विद्या संकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वडघर गावाच्या हद्दीत नददीवर वनराई बंधारा बांधला.
शनिवार दि.१० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा. ग्रुप ग्रामपंचायत मांजरवणेच्या सरपंचा पुष्पा साळवी, रायगड युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनवेश साळवी, कर्तव्यदक्ष ग्रामसेवक मनोहर शितकर, शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे ,यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बंधारा बांधकाम सुरु करण्यात आले.
यावेळी शाळेचे शिक्षक राजन पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. वनराई बंधारा बांधण्याचे फायदे याचा उल्लेख केला. या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे जमिनीच्या पाणी पातळत वाढ झाल्यास विहिरी व तलाव यांच्या पाण्याची पातळीत वाढ होते, परिसरातील गाई -गुरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. कपडे धुणे इ महत्त्व पूर्ण कारणासाठी याचा उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला.
पाणी आडवा व पाणी जिरवा हा संदेश विद्यार्थी मनावर बिंबवला जातो. हा वनराई बंधारा बांधण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत मांजरवणे यांनी महत्त्व पूर्ण योगदान दिले.
शाळेतील शिक्षक सुरेश भेदाटे, विद्या शिर्के ,विठ्ठल पवार, प्रमुख भिवा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी अपार मेहनत घेऊन हा बंधारा बांधला.